मुंबई : ‘बिग बॉस 16’मध्ये हजेरी लावल्यानंतर अभिनेता शिव ठाकरेला देशभरात खूप प्रसिद्धी मिळाली. शिवने सुरुवातीपासूनच विविध रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. 2015 पासून शिव इंडस्ट्रीत काम करत आहे. तो रोडीज या प्रसिद्ध शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. मुंबईत आल्यानंतर मला समजलं की फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही भिती वाटू शकते, असं तो म्हणाला. या मुलाखतीत शिवने कास्टिंग काऊचचे दोन अनुभव सांगितले.
ऑडिशनला गेला असता शिव ठाकरेला एका व्यक्तीने मसाज सेंटरला बोलावलं होतं. याविषयी सांगताना तो म्हणाला, “मी आरामनगरमध्ये एका ऑडिशनला गेलो होतो. त्या व्यक्तीने मला बाथरुमच्या दिशेने नेलं आणि म्हणाला, इथे मसाज सेंटर आहे. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा काय संबंधच समजला नाही. तर तो पुढे म्हणाला, ऑडिशननंतर एकदा तू इथे ये. तू वर्कआऊटसुद्धा करतोस. तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताच वाद घालायचा नव्हता म्हणून मी तिथून थेट निघालो. मी काही सलमान खान नाही. पण एक गोष्ट मला समजली ती म्हणजे कास्टिंग काऊचचा मुद्दा असेल तर त्यात स्त्री किंवा पुरुष असा काही भेदभावच नाही.”
या मुलाखतीत शिवने आणखी एक अनुभव सांगितला. एका महिलेनं त्याला रात्री 11 वाजता ऑडिशनसाठी बोलावलं होतं. “चार बंगला याठिकाणी एक मॅडम होती. मी याला हिरो बनवलं, त्याला बनवलं.. असं ती सतत म्हणायची. तिने मला रात्री 11 वाजता ऑडिशनला बोलावलं होतं. मी इतका भोळा तर नाही की रात्रीच्या ऑडिशनचा अर्थ मला समजू शकणार नाही. मी तिला काहीतरी कारण देऊन नकार दिला. त्यावर तिने विचारलं, तुला काम करायचं नाहीये का? असा वागलास तर तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही”, असं तो म्हणाला.
कास्टिंग काऊचशिवाय इंडस्ट्रीत शिव ठाकरेला असेही काही लोक भेटले ज्यांनी भूमिकांच्या बदल्यात पैसे देण्याची ऑफर दिली होती. “अनेकांनी माझ्याकडे पैसे मागितले. तू आम्हाला पैसे दे, आम्ही तुला चांगल्या भूमिका देऊ.. असं अनेकजण म्हणाले”, असंही त्याने सांगितलं.