‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेहमीच काहीतरी नवीन विषय, आशय पहायला मिळत. नुकतंच या ओटीटीवर ‘आयुष्याची जय’ हा एक पॉडकास्ट शो सुरू झाला आहे. यात प्रेक्षकांच्या लाडक्या सेलिब्रिटींसोबत भरपूर गप्पा मारल्या जाणार आहेत. अनेकांना त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दलचे माहित नसलेले अनेक किस्से यावेळी ऐकायला मिळतील. या शोच्या पहिल्याच भागात ‘बिग बॉस मराठी सिझन 2’चा विजेता शिव ठाकरे सहभागी होणार आहे. या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये शिव ठाकरे हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करताना दिसत आहे. त्याचं गडांप्रती असलेलं प्रेमही यातून दिसत आहे. त्यामुळे या शोमधून शिव किती महाराजभक्त आहे, याचं दर्शन घडतंय. “राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त वापर करतात. त्यामुळे महाराजांचे फक्त नाव घेऊ नका, आमच्या गडांकडेही बघा,” अशी विनंतीही शिवने यावेळी केली आहे. याव्यतिरिक्त शिवच्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याने इथे उलगडल्या आहेत.
या शोबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “कलाकारांच्या आयुष्यातील अनुभव, वैचारिक मत, त्यांच्यासाठी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना ‘आयुष्याची जय’ या शोच्या माध्यमातून समजणार आहेत. या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असून पुढे या शोमध्ये रॅपर सृष्टी तावडे, स्मिता तांबे, श्रेया बुगडे, युट्यूबर विनायक माळी यांसारखे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.”
‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे शिव ठाकरे प्रकाशझोतात आला. ‘बिग बॉस मराठी 2’ जिंकल्यानंतर शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र तो हा शो जिंकू शकला नाही. यामध्ये तो रनरअप ठरला होता. मात्र बिग बॉसच्या शोनंतर आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं शिव एका पॉडकास्टमध्ये म्हणाला. शोमुळे शिव ठाकरेची चांगली कमाई होऊ लागली होती आणि एकानंतर एक सलग त्याला तीन रिॲलिटी शोजचे ऑफर्स मिळाले होते. बिग बॉसमध्ये येण्याआधी तो ‘रोडिज’ या शोमध्ये सहभागी झाला होता. नुकताच त्याने ‘झलक दिखला जा 11’मध्येही भाग घेतला होता.