‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. नुकतंच बिग बॉसच्या घरातील पहिलं एलिमिनेशन पार पडलं. घरातून पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुरुषोत्तमदादा एक वेगळा फ्लेवर घेऊन आले होते. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला. ‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी घरातून एक्झिट घेतली. मात्र त्यांच्या एक्झिटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र अरबाज पटेल शांत उभा होता. यावरूनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुरुषोत्तम दादा पाटील आणि घरातील इतर सर्व स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करत होते. पण त्यावेळी अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. ‘अशा वृत्तीच्या लोकांना काय बोलावं’, असा सवाल एकाने केला. तर ‘अरबाजच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. त्याला अभंग येत नसेल पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, तेव्हा पण त्याने तोंड उघडलं नाही. एवढी लाज वाटते तर बिग बॉस मराठीत भाग का घेतला’, असं सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘महाराष्ट्राच्या जनतेनं त्याला झिरो वोट करून घराबाहेर काढलं पाहिजे’, असंही काहींनी म्हटलंय.
अरबाज हा अभिनेता आणि मॉडेल आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने ‘स्प्लिट्सव्हिला’ या शोमध्येही भाग घेतला होता. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरबाज पटेल आणि अरबाज शेख अशी दोन नावं पहायला मिळतात. त्याचे इन्स्टावर 20 लाख तर युट्यूबवर 10 लाख फॉलोअर्स आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, “बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकल्याचं मला वाटत नाही. घरामधला वावर कसा करायचा हे समजता समजता बाहेर आलोय. ‘बिग बॉस मराठी’चा अनुभव थरारक आहे. स्वत:शी ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं हे घर फार महत्त्वाचं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एखाद्या गोष्टीला प्रतिकार करायला मला जमलं नाही. तरी जिथे नडता आलं तिथे नडलो. हा सिझन अभिजीत सावंत जिंकू शकतो. तर सूरज चव्हाण या सिझनमधील कमजोर खेळाडू आहे.”