‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर चांगल्याच चर्चेत होत्या. आता सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा अठरावा सिझन सुरू आहे. यामधील स्पर्धक शिल्पा शिरोडकर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वर्षा यांनी शिल्पाच्या खेळीवर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी हा सिझन आवर्जून बघतेय. यंदाचा सिझन रंजक आणि बघण्यासारखा आहे. शिल्पा घरात ज्याप्रकारे स्वत:ला हाताळतेय, ते मला आवडतंय. शांत डोक्याने ती खेळ खेळतेय. पण कधीकधी ती खूपच भावनिक होते. इतकं भावनिक होण्याची काही गरज नाही असं मला वाटतं.”
बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर स्पर्धकांच्या भावनिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतो, हेसुद्धा वर्षा यांनी अधोरेखित केलं. शिल्पा यांच्या शांत स्वभावाचं कौतुक करत असतानाच त्यांनी तिचं सतत भावनिक होणं गरजेचं नसल्याचं मत मांडलंय. “अर्थात हे व्यक्तीसापेक्ष आहे. मला तिच्यावर टीका करायची नाही, पण मला असं वाटतं की सतत रडायची गरज नाही. काही गोष्टींबद्दल इतकं वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही”, असं वर्षा म्हणाल्या.
स्वत:चा अनुभव सांगताना वर्षा उसगांवकर पुढे म्हणाल्या, “मीसुद्धा बिग बॉसच्या घरात होते आणि निक्की तांबोळीसारख्या स्पर्धकांनी माझा खूप अपमान केला. घरातल्या इतर स्पर्धकांनीही अपमान केला. पण मी बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच स्वत:च्या मनाशी पक्कं केलं होतं की जितके दिवस राहीन, तितके दिवस चांगल्या मनाने खेळ खेळीन. लोकांचं बोलणं मी मनाला लावून घेणार नाही, हे मी स्वत:शीच ठरवलं होतं. कारण सर्व प्रकारच्या स्वभावाची माणसं बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येतात. त्यामुळे तुम्हाला अपमान आणि कौतुक या दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजेत. मी कधीच भावनिक झाले नव्हते, कारण मला काही फरक पडत नव्हता. मी कधीच दुसऱ्यांचा अपमान केला नाही किंवा वाईट भाषेत इतरांशी बोलले नाही. पण हो, जे खरंय ते मी तोंडावर बोलत गेले.”
वर्षा उसगांवकर यांच्या मते ‘बिग बॉस 18’चं विजेतेपद विवियन डिसेना किंवा करणवीर मेहरा पटकावू शकतो. त्याचप्रमाणे चाहत पांडे आणि ईशा सिंहसुद्धा तगडे स्पर्धक असल्याचं त्यांनी म्हटलंय.