‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला आहे. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही 15 सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते, ते सदस्य आता दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गुलीगत सूरज चव्हाण यांच्या कडाक्याचं भांडण झाल्याचं पहायला मिळतंय.
या प्रोमोमध्ये जान्हवी सूरजला म्हणतेय, “तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही”. त्यावर सूरज जान्हवीला उत्तर देतो, “तू निघ… चल फूट.” गुलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे प्रेक्षकांना बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळेल.
या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘निक्कीच्या आधी जान्हवीच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार. सूरजसोबत पंगा घ्यायचा नाही, त्याच्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सूरजला पूर्ण पाठिंबा आहे, जान्हवी लवकरच घराबाहेर जाणार’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सूरज आणि डीपी दादाला पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते गरीब घरातील आहेत, खेड्यापाड्यातील आहेत’, असंही काहींनी म्हटलंय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता आपल्या स्टाइलने सर्वांना गुलीगत चीत करताना दिसून येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. गेल्या आठवड्यात निक्की सूरजला म्हणते, “तू मला चॅलेंज करतोस ना? तू विचार पण करू शकत नाही असं माझं रुप पाहशील.” त्यानंतर कन्फेशन रुममध्ये ‘बिग बॉस’ सूरजला म्हणतो ,”तू न घाबरता खेळ”. बिग बॉसकडून पाठिंबा मिळाल्यानंतर सूरज म्हणाला, “आता मी नसतो कोणाला भीत…कारण मी आहे गुलीगत टॉपचा किंग.”