सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवलेल्या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. बिग बॉसनंतर सूरजच्या चाहतावर्गात आणखी वाढ झाली. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सूरजने एक स्वप्न पाहिलं होतं. आपलं हक्काचं घर असावं, असं त्याचं स्वप्न होतं. आता शो संपल्यानंतर तो हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं टाकताना दिसतोय. सूरजने त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलंय. त्याची झलक त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दाखवली. सूरजचा हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर गावात हक्काचं घर बांधण्याची इच्छा सूरजने बोलून दाखवली होती. इतकंच नव्हे तर त्या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार असल्याचंही तो म्हणाला होता. आता त्याच घराच्या बांधकामाचा व्हिडीओ पोस्ट करत सूरजने लिहिलं, ‘माझं घर.. लवकरच बिग बॉसचा बंगला.’ सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘ज्याला कष्टाची लाज नाही तो व्यक्ती आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘जिथे तू खूप स्वप्नं पाहिलीत त्या जागी तुझा बंगला उभा राहतोय, खूप छान वाटतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काही नेटकऱ्यांनीही सूरजसाठी मदतीचा हात पुढे केला. ‘तुझ्या नव्या घरात मी लाइट फिटिंग करून देतो, तेसुद्धा तुझ्याकडून एक रुपया न घेता’, असं एका युजरने लिहिलं आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात सूरजचा जन्म झाला. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सूरजचं बालपण सर्वसामान्य मुलांसारखं नव्हतं. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आजारपणात आईनेही जीव गमावला होता. सूरजला पाच मोठ्या बहिणी आहेत. त्या सर्वांचा त्याने सांभाळ केला. मिळेत ते काम, मजुरी करत त्याने कुटुंबाचा गाडा चालवला. अशातच सोशल मीडियामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीला टिकटॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर सूरजचे व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागले. आपल्या हटके स्टाइलमुळे सूरजला नेटकऱ्यांची पसंती मिळू लागली.