‘राजा राणी’वर बंदीची मागणी करणाऱ्या वकिलांनी अखेर सूरज चव्हाणची मागितली माफी

| Updated on: Oct 24, 2024 | 2:49 PM

सूरज चव्हाणचा अभिनय असलेला ‘राजा राणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. ग्रामीण आणि सत्य प्रेमकहाणीवर आधारित असलेला हा चित्रपट तीनशेहून अधिक थिएटरमध्ये आणि चारशेहून अधिक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राजा राणीवर बंदीची मागणी करणाऱ्या वकिलांनी अखेर सूरज चव्हाणची मागितली माफी
Raja Rani movie
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘राजा राणी’ हा चित्रपट समाजासाठी घातक असून या चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, असा आरोप वकील वाजिद खान (बिडकर) यांनी केला होता. इतकंच नव्हे तर सूरजच्या या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर सूरजने प्रेक्षकांसमोर आवाहन केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट सूरज चव्हाण’ या हॅशटॅगने त्याच्या समर्थनार्थ मोहीमच चालवली होती. ‘राजा राणी’च्या निर्मात्यांनी वकिलांना चित्रपट पूर्ण पाहा आणि त्यानंतर आपलं मत कळवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर वकिलांनीही चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांना फोन करून आपण चर्चा करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं होतं. आता सूरजच्या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्या वकिलांनीच त्याची माफी मागितली आहे.

चित्रपटाला विरोध करणारे वकील वाजिद खान, ‘राजा राणी’ चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दौलताडे, दिग्दर्शक शिवाजी दौलताडे, अभिनेता रोहन पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वकील वाजिद खान यांनी सूरज चव्हाण आणि त्याच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची जाहीर माफी मागितली. “माझ्याकडून चित्रपटाबाबत गैरसमज झाला. पूर्ण माहिती न घेता आम्ही हे वक्तव्य केलं. यामुळे ज्यांची मनं दुखावली असतील त्यांची मी माफी मागतो”, असं वाजिद खान म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी चित्रपटाचे निर्माते म्हणाले, “आमचा राजा राजाणी हा चित्रपट खरा आहे आणि शेवटी सत्याचाच विजय झाला.” तर “माझा चित्रपट मुलामुलींमध्ये चांगला संदेश देणारा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतोय”, असं दिग्दर्शक शिवाजी दौलताडे म्हणाले. या चित्रपटावर बंदी आणली असती तर आमच्यावर आत्महत्येची वेळ आली असती, अशी भावना मुख्य अभिनेता रोहन पाटीलने बोलून दाखवली.

चित्रपटाला विरोध का झाला?

“बिग बॉस मराठीनंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्याला फॉलो करतात. पण त्याचा ‘राजा राणी’ हा त्याचा चित्रपट पाहून अनेक तरुण-तरुणी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात. याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असं दाखवण्यात आलं आहे की समाज आणि नातेवाईकांमुळे चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचं पाऊल उचलत एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा चुकीचा संदेश चित्रपटाच्या सरतेशेवटी देण्यात आलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे,” असं वाजिद खान यांनी म्हटलं होतं.