‘सूरज जिंकला तर मी बिग बॉस मराठी बघणंच सोडून देईन’; प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली?

| Updated on: Aug 20, 2024 | 10:16 AM

'बिग बॉस मराठी 5'चा खेळ दिवसेंदिवस चांगलाच रंगतोय. प्रत्येक टास्कदरम्यान स्पर्धकांचा कस लागतोय. सूरज चव्हाणने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र तो जिंकला तर बिग बॉस बघणंच सोडून देईन, असं एका अभिनेत्रीने म्हटलंय.

सूरज जिंकला तर मी बिग बॉस मराठी बघणंच सोडून देईन; प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली?
सूरज चव्हाण
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी 5’चा तिसरा आठवडा गुलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला होता. त्यावरून सूत्रसंचालक रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये सूरजचं भरभरून कौतुकसुद्धा केलं. सूरज कॅप्टन झाला नसला तरी त्याने टास्कमध्ये बाजी मारली होती. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याची खेळी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. “या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. अख्खं घर म्हणतं त्याला गेम क”ळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला”, अशा शब्दांत रितेशने त्याची पाठ थोपटली. मात्र ‘सिंपथी’च्या आधारे तो पुढे जाऊ शकत नाही, असं मत ‘बिग बॉस मराठी’च्या माजी स्पर्धकाने नोंदवलं आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आरती सोळंकी म्हणाली, “मी साधाभोळा, गरीब घरातून आलोय, इथून आलोय, तिथून आलोय असं बोलून चालत नाही. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे. त्यामुळे या गोष्टीला माझ्याकडून तरी सहानुभूती नाही मिळणार. मीसुद्धा गरीब, चाळीतली पोरगी आहे. त्यामुळे एखादा गरीब जिंकला तर मला नक्कीच आवडेल. त्याला या शोमधून आणखी प्रसिद्धी मिळू दे. जिथे तो 80 हजार रुपये घेतोय, तिथे 8 लाख घेऊ दे. पण काहीच खेळ न खेळता तो पुढपर्यंत गेला आणि जिंकला तर पुढचा सिझनच मी बघणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतेय. कारण बिग बॉसचा खेळ खूप कठीण आहे. मी गरीब.. अशी सिंपथी मी नाही पचवू शकत.”

हे सुद्धा वाचा

भाऊच्या धक्क्यावर रितेशने मात्र सूरजचं तोंडभरून कौतुक केलं होतं. “झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता है. तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या. कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका”, असं तो म्हणाला होता. तसंच यापुढे बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेशने सूरजला दिला होता.