बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं. त्यानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचा आरोप तिने या परिषदेत केला. त्यानंतर अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेनंही प्राजक्ताच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्राजक्ताला पाठिंबा देत असतानाच राजकारण्यांना आणि करुणा मुंडे यांना चांगलंच सुनावलं आहे.
“आज मी तुमच्यासमोर माझं मत व्यक्त करण्यासाठी आले आहे. हे मत व्यक्त करणं ही माझी जबाबदारी समजते. एक स्त्री म्हणून, एक महिला कलाकार म्हणून मी माझं हे कर्तव्य समजते. आमची एक जवळची मैत्रीण आहे, जी उत्तम अभिनेत्री आहे, जिच्या कामाचं तुम्ही नेहमी कौतुक केलंय, जिची कर्तबगारी ही वाखाणण्याजोगी आहे. गेल्या दहा वर्षांत त्या मुलीने स्वत:च्या पायावर, स्वत:च्या हिंमतीवर जे करून दाखवलंय, तिचं विश्व निर्माण केलंय.. ते खरोखर कौतुक करण्यासारखं आहे, हेवा वाटण्यासारखं आहे. तिचं नाव आहे प्राजक्ता माळी. प्राजक्ता.. मला तुझा प्रचंड अभिमान आहे. मला तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे. कारण भल्याभल्यांना जमणार नाही, इतकं छान तू तुझं करिअर उभारून दाखवलंस. फक्त एक अभिनेत्री म्हणूनच नाही, तर उत्तम निर्माती आणि उत्तम उद्योजिका म्हणून जे करतेय, ते सगळंच कौतुकास्पद आहे. ते करण्यासाठी तू डोक्यावर घेतलेलं कर्जाचं डोंगर आम्हाला माहीत आहे. त्यासाठी तू केलेले दिवसरात्र कष्ट आम्हाला माहीत आहेत. तू किती कष्टाने, मेहनतीने आणि हिंमतीने या गोष्टी साध्य केल्यास, त्याचा आम्हाला अभिमान आहे”, असं ती म्हणाली.
प्राजक्ताला पाठिंबा देत ती पुढे म्हणाली, “प्राजक्ता घाबरू नकोस, आम्ही सगळे कलाकार तुझ्या पाठिशी आहोत आणि कायम राहू. कारण तुझं साम्राज्य उभं करण्यासाठी तू जे कष्ट घेतलेस, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे तुला कुठल्याही सोम्या-गोम्यांच्या फालतू टिप्पणींना घाबरून जाण्याचं किंवा चिंतीत होण्याचं कारण नाही. जे अशी टिप्पणी करतात आणि दुसऱ्याच्या नावाचा उपयोग करून, त्यांच्या अब्रूवर शिंतोडे उडवून, स्वत:चा उल्लू सीधे करण्याचा त्यांचा जो काही केविलवाला प्रयत्न असतो.. तो त्यांची मानसिकता दाखवतो. कारण जे एखाद्या पुरुषालाही शक्य होणार नाही, इतकी कर्तबगारी तू तुझ्या आयुष्यात दाखवली आहेस. एकटीच्या जिवावर आणि कुटुंबाचा आधार घेत तू आजवर जे काही केलंस, ते प्रत्येकाला जमण्यासारखं नाही. तुझं काम, तुझं चरित्र आणि आजवर तू घेतलेले कष्ट हे सूर्यप्रकाशासारखे लख्ख आहेत.”
“त्या राजकारण्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही ज्या पद्धतीने एका स्त्रीला वेठीशी धरून, तिचं नाव घेऊन, अनेक स्त्रियांची नावं घेऊन तुम्ही ज्याप्रकारे त्यांचं वर्णन करत होता, ते तुम्ही त्यांचं वर्णन केलं नाहीये. तर ते तुम्ही तुमच्या मानसिकतेचं वर्णन केलंय. तुमच्या कुचक्या मानसिकतेचं वर्णन केलंय. यापुढे कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना हासुद्धा विचार करा की तुमच्याही घरात आया-बहिणी आहेत आणि हा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. तुम्ही जे काही बोलताय, जी कृती करताय, जी टीका-टिप्पणी करताय.. ती आम्ही सगळी बघतोय. तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतली, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कर्तबगारी दाखवली आहे, त्यांची नावं घेऊन काय साध्य होणार आहे”, असा सवाल मेघानं केला.
“दुसऱ्या नेत्याशी तुमचे काही वितुष्ट असेल, काही राजकीय मतभेद असतील तर ते तुम्ही एकमेकांची नावं घेऊन मिटवण्याची प्रयतत्न करा. त्यासाठी दुसऱ्यांना त्यात ओढण्याची काहीच गरज नाही. कारण ज्यांची नावं तुम्ही घेतलात, त्या काही रस्त्यावर बसलेल्या नाहीयेत. कोणाचं नाव घेऊन तुम्ही तुमची कर्तबगारी सिद्ध करू शकत नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात स्त्रियांना आदरच मिळायला पाहिजे. या पद्धतीची वागणूक ही अत्यंत निषेधार्ह आहे. मी करुणा मुंडेंनाही हेच म्हणेन की तुमचं जे आहे, ते पर्सनल आहे. त्यात दुसऱ्यांना ओढण्याची आवश्यकता नाही. तुमचं तुमच्या नवऱ्यासोबत जे भांडण आहे, ते त्याच्यासोबत निपटा. कुठलाही पुरावा हाती नसताना दुसऱ्यांना बदनाम करण्याचा तुम्हाला अधिकार नाही”, अशा शब्दांत मेघा व्यक्त झाली.