‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. हिंदी भाषेतील बिग बॉसला तुफान यश मिळाल्यानंतर इतर स्थानिक भाषांमध्येही हा शो सुरू झाला. ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र गेल्या दोन वर्षांत ‘बिग बॉस मराठी’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या सिझनचा नवा प्रोमो पोस्ट करण्यात आला. या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइजदेखील पहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’चा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या चारही सिझन्सचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. प्रेक्षकांनाही त्यांची स्टाइल आणि ‘बिग बॉसची चावडी’ खूप आवडायची. महेश मांजरेकर ज्याप्रकारे स्पर्धकांची शाळा घ्यायचे, ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वीकेंडच्या एपिसोडची वाट पाहायचे. मात्र यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याने प्रोमोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी रितेशच्या या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली. तर काहींनी महेश मांजरेकर नसल्याने नाराजी व्यक्त केली.
‘महेश मांजरेकर यांना मिस करतोय, पण रितेश दादा तुझं स्वागत’, असं एकाने लिहिलं. तर ‘महेश मांजरेकर हेच हवे होते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘महेश मांजरेकर हे प्रत्येकाच्या आवडीचे आहेत, पण रितेश हा शो कसा हँडल करतो, तेसुद्धा पाहणं गरजेचं आहे. शो सुरू होण्याआधीच काही बोलू शकत नाही’, असं एका युजरने लिहिलं आहे. त्यामुळे काहीजण नाराज असले तरी काहीजण रितेशचं सूत्रसंचालन पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. काही स्पर्धकांची नावं चर्चेत आहेत. बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये नवा ड्रामा पहायला मिळणार हे नक्की. त्याचसोबत बिग बॉसचं नवीन घर कसं असेल, शोची नवीन संकल्पना कशी असेल, नवे खेळ कोणते असतील, याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.