मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडला. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये बक्षिस मिळालं होतं. तर ‘फुकरा इन्सान’ म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर अभिषेक मल्हान हा फर्स्ट रनरअप ठरला होता. विजेता घोषित होताच ट्विटरवर अभिषेक आणि एल्विशचे चाहते आपापसांत भिडले. अभिषेकच्या चाहत्यांचं म्हणणं होतं की त्याने सुरूवातीपासून शेवटपर्यंत दमदार खेळी दाखवली होती. त्यामुळे विजेतेपद त्यालाचा मिळायला पाहिजे. या वादादरम्यान आता ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ग्रँड फिनालेमध्ये कोणाला किती मतं मिळाली, याची माहिती समोर आली आहे.
एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान या दोघांमध्ये ‘कांटे की कट्टर’ होती. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये फार कमी फरक होता. एल्विश यादवला फिनालेमध्ये 54 टक्के मतं मिळाली तर अभिषेकला 46 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच फक्त आठ टक्क्यांच्या फरकाने एल्विश हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी तगडी स्पर्धा पहायला मिळाली. जिथे मतांमध्ये फक्त आठ टक्क्यांचा फरक होता.
‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ग्रँड फिनालेमध्ये किती मतदान झालं आणि एकाच वेळी किती लोकांनी हा शो पाहिला याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, एकत्र 72 लाख लोकांनी सलमान खानचा हा शो पाहिला होता. शेवटच्या टप्प्यात जेव्हा वोटिंग लाइन सुरू करण्यात आले होते, तेव्हा त्या 15 मिनिटांत तब्बल 25 कोटी मतं मिळाली होती. हा आकडा म्हणजे जणू एखादा विक्रमच आहे. जियोने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की एकूण 540 कोटी वोट्स संपूर्ण सिझनमध्ये वेगवेगळ्या स्पर्धकांच्या नावे मिळाली आहेत.
जवळपास आठ आठवड्यांच्या धमाकेदार सिझननंतर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी पार पडला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 13.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.