मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जिया शंकरने ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी झालेल्या ‘मिड वीक एविक्शन’मध्ये कमी मतांमुळे तिला घराबाहेर पडावं लागलं. या शोमध्ये जियाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले होते. तिने सांगितलं की गेल्या 20 वर्षांपासून ती तिच्या वडिलांना भेटली नाही. त्यांची खूप आठवण येत असल्याचीही भावना तिने व्यक्त केली होती. जिया शंकरने ‘मेरी हानिकारक बिवी’ या मालिकेत डॉ. इरा पांडेची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘काटेलाल अँड सन्स’ या मालिकेत ती सुशीलाच्या भूमिकेत झळकली. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटात ती झळकली होती.
जिया शंकरने बिग बॉसच्या घराबाहेर पडण्याआधी एल्विश यादवसोबत गप्पा मारताना वडिलांचा उल्लेख केला होता. तुला तुझ्या वडिलांशी बोलायला आवडत नाही का, असा प्रश्न जेव्हा एल्विशने विचारला तेव्हा ती म्हणाली, “नाही, आम्ही एकमेकांशी बोलत नाही. मला हेसुद्धा माहीत नाही की ते कुठे आहे, ते कसे दिसतात. मी त्यांचा आवाजसुद्धा ऐकला नाही. गेल्या 20 वर्षांपासून मी त्यांच्याशी बोलले नाही आणि आमचा एकमेकांशी काहीच संपर्क नाही. त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. ते त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. आता ते आमची चिंता का करतील?”
जियाने हेसुद्धा स्पष्ट केलं की तिच्या बाबांनी कधीच तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे या गोष्टींना आता इतकी वर्षे उलटून गेली आहेत की त्यामुळे काहीच वाटत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. ती पुढे म्हणाली, “मी जेव्हा दुसऱ्या कुटुंबाना एकत्र पाहते, जेव्हा एखादी वयस्कर व्यक्ती माझ्याशी काही बोलते आणि त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही, तेव्हा मला वडिलांची कमतरता जाणवते. जेव्हा मी लहान होती आणि मला कोणी बोललं तर मी लगेच बाबांकडे धावत जायचे आणि त्यांच्याकडे तक्रार करायचे. ते माझा पाठिंबा द्यायचे. माझी ते खूप काळजी करायचे. आजही जेव्हा मला असुरक्षिततेची भावना जाणवते, तेव्हा सर्वांत आधी त्यांची आठवण येते.”