मुंबई : भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठा रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस. सलमान खानने या शोच्या सर्वाधिक सिझनचं सूत्रसंचालन केलं आहे. बिग बॉसच्या 16 व्या सिझनलाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सलमानने होस्ट केलेले बिग बॉसचे सिझन हिट ठरले आहेत. मात्र जेव्हा बिग बॉस ओटीटीवर आला, तेव्हा त्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला देण्यात आली होती. करणने बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन केलं होतं. आता त्याचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनसह करण जोहरला मोठा झटका लागला आहे.
पुन्हा एकदा बिग बॉस ओटीटी 2 ची चर्चा सुरू झाली आहे. या सिझनचंही सूत्रसंचालन करण जोहरच करणार, असं आधी म्हटलं जात होतं. मात्र आता करणची जागा बॉलिवूडच्या ‘भाईजान’ने घेतल्याचं कळतंय. इंडियन फॉर्म्सच्या रिपोर्टनुसार बिग बॉस ओटीटी 2 चं सूत्रसंचालन करण जोहर करणार नाही. सलमानकडेच ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी निर्मात्यांनी त्याच्यासोबत तगडी डील केल्याचं समजतंय.
‘बिग बॉस’मध्ये जेव्हा ‘वीकेंड का वार’ हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतो, तेव्हा त्याला सर्वाधिक पसंती मिळते. कारण या एपिसोडमध्ये सलमान खान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो आणि काहींना सल्लेसुद्धा देतो. स्पर्धकांशी संवाद साधण्याचा सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो. बिग बॉस ओटीटीचा हा दुसरा सिझन जून महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतो. हा सिझनसुद्धा तीन महिन्यांसाठी दाखवला जाणार आहे. वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिझन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दिव्या अगरवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली होती. यामध्ये शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, झिशान खान, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन यांनी सहभाग घेतला होता. बिग बॉस ओटीटीचा फिनाले पार पडल्यानंतर प्रतीक, शमिता आणि निशांत हे बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
कॉमेडियन आणि लॉक-अप या शोचा विजेता मुनव्वर फारुकी बिग बॉस ओटीटी 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची चर्चा आहे. याशिवाय अर्चना गौतमचा भाऊ गुलशनच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र याविषयी अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.