मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अविनाश सचदेव आणि जद हदिद बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर टॉप 6 स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचतील असा अंदाज होता. मात्र फिनालेच्या अगदी जवळपर्यंत आल्यानंतर घरातील एका स्पर्धकाचा प्रवास संपला. दर आठवड्याच्या शेवटी घरातून एक स्पर्धक बाद होतो. मात्र फिनालेपूर्वी आठवड्याच्या मध्यातच एलिमिनेशन पार पडलं. यावेळी जिया शंकरला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. तिच्या जाण्यानंतर आता मनीषा राणी, एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट आणि बेबिका धुर्वे हे पाच जणं अंतिम फेरीत पोहोचले आहेत. बिग बॉसने ‘मिड वीक एविक्शन’चा निर्णय घेतला आणि कमी मतांमुळे जिया शंकरला बेघर व्हावं लागलं.
बुधवारी बिग बॉसने गार्डन एरियानमध्ये स्पर्धकांना एक टास्क दिला. त्याठिकाणी एक कॅलेंडर ठेवण्यात आलं होतं आणि त्यातील प्रत्येक पानावर अशा स्पर्धकाचा फोटो होता, जो आधीच घराबाहेर गेला आहे. बेबिकाला कॅलेंडरचं पान पलटण्यास सांगितलं गेलं. प्रत्येक पानावर बाद झालेल्या स्पर्धकाशी संबंधित काही आठवणी होत्या. अखेरच्या पानावर पोहोचल्यानंतर बिग बॉसने कोणत्याही एकाला पुढे येऊन पान उलटण्यास सांगितलं. तेव्हा अभिषेक मल्हानने पुढे येत अखेरचं पान उघडलं, त्यावर जिया शंकरच्या आठवणी होत्या. त्यानंतर जिया मुख्य द्वारातून घराबाहेर पडली.
Mid week elimination
As expected, jiya shankar got eliminated from BB House.#BBOTT2 #BiggBossOtt2 pic.twitter.com/nPhdGkrkRW
— Disha (@dishagoyal539) August 9, 2023
जिया शंकर बाद होताच ट्विटरवर तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. जिया शंकर हा सिझन जिंकू शकली असती असा अंदाज काहीजण वर्तवत आहेत. तर काहींनी निर्मात्यांवर पक्षपातीचा आरोप केला आहे. मात्र ग्रँड फिनालेच्या जवळपर्यंत येऊन घराबाहेर पडल्यानंतरही जियाच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळालं. तिने घराबाहेर पडताना बिग बॉसचे आभार मानले. या घराने मला खूप काही आठवणी दिल्या आणि या आठवणीच माझ्यासाठी ट्रॉफी आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. “मला बिग बॉसने त्यांच्या घरी बोलावलं, यासाठी मी खूप आभारी आहे. या घरातून मी बरंच काही माझ्यासोबत घेऊन जातेय. जियाच्या जनतेचं मी आभार मानू इच्छिते. या घरातून मी खरी ट्रॉफी घेऊन जातेय. आतापर्यंत माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद”, असं ती म्हणाली.