‘बिग बॉस’ म्हटलं की अभिनेता सलमान खानचा चेहरा सर्वांसमोर येतो. कारण गेल्या अनेक सिझन्सपासून सलमानच या शोचं सूत्रसंचालन करत आहे. मात्र आता ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सिझनचं सूत्रसंचालन तो करणार नाही. शूटिंग आणि इतर प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी त्याने ‘बिग बॉस ओटीटी 3’ला नकार दिला आहे. त्याच्या जागी आता अभिनेते अनिल कपूर यांची वर्णी लागली आहे. ‘बिग बॉस’ हा शो त्यातील ड्रामा आणि कॉन्ट्रोव्हर्सीमुळे सर्वाधिक चर्चेत असतो. त्यातच सलमान खानच्या खास शैलीतील सूत्रसंचालनामुळे या शोची रंगत अधिक वाढते. त्यामुळे सलमानची जागा दुसरा अभिनेता घेणार असल्याचं समजताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या शोसाठी अनिल कपूर यांना किती मानधन दिलं जातंय, याची माहिती समोर आली आहे. ‘बिग बॉस’साठी अनिल कपूर यांना जितकं मानधन मिळणार आहे, त्यापेक्षा सहा पटींनी जास्त मानधन सलमानला मिळत होतं.
‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सिझनमध्ये पुन्हा सलमानची घरवापसी झाली होती. आता तिसऱ्या सिझनमध्ये अनिल कपूर हे त्यांच्या खास अंदाजात सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. याबद्दल निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र शोच्या टीझरमधील ‘झकास’ हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांनी अनिल कपूर यांच्या नावाचा अंदाज वर्तवला आहे. ‘फिल्मी बीट’ने दिलेल्या माहितीनुसार, सलमानला बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तब्बल 12 कोटी रुपये मानधन मिळायचं. आता अनिल कपूर यांना एका एपिसोडसाठी 2 कोटी रुपये मिळणार आहेत.
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याचीही उत्सुकता आहे. यामध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून काढून टाकण्यात आलेला अभिनेता शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, संकेत उपाध्याय, दीपक चौरसिया, शिझान खान, रोहित खत्री, अरहान बहल यांच्या नावांची चर्चा आहे.