बिग बॉस ओटीटीचं तिसरं सिझन सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिझनमध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकनेही त्याच्या दोन्ही पत्नींसोबत स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. अरमानने पायल आणि कृतिका मलिक यांच्याशी लग्न केलंय. आता बिग बॉसच्या घरातही तो दोन्ही पत्नींसोबत राहत असल्याने सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे अरमानला दोन लग्नावरून ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे बिग बॉसवर बहुपत्नीत्वचा प्रसार केल्याप्रकरणी टीका केली जातेय. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीन भट्टाचार्जीने पुन्हा एकदा अरमान आणि बिग बॉसवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
देवोलीनाने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अरमान मलिकची एक क्लिप शेअर करत लिहिलं, ‘मी प्रत्येक पुरुषाबद्दल तर बोलू शकत नाही, पण निश्चितपणे ठरकी विचार असणारे पुरुषच दोन, तीन किंवा चार पत्नी ठेवायचा विचार करत असतील. कृपा करून हा घाणेरडापणा बंद करा. देवाखातर तरी याला बंद करा. जर एकेदिवशी पत्नी म्हणू लागल्या की त्यांनासुद्धा एकापेक्षा अधिक पती हवे आहेत, तेव्हा पाहू कितीजण हा शो एंजॉय करतील. तो दिवसही फार लांब नाही. जे लोक आज बोलत आहेत की हे त्याचं आयुष्य आहे, तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत खुश असेल तर तुम्हाला काय समस्या आहे, त्यांना मला त्यादिवशी पहायचं आहे. काळजी करू नका, कर्माचं चक्र अशाच पद्धतीने चालतं.’
I can’t say about every man, but surely those with lewd intentions must desire to have 2, 3, or 4 wives. Please stop this filth. For god sake stop this.
Someday if those same wives start saying that they also wish to have 2 husbands each, then enjoy watching that too.… pic.twitter.com/LhxUD1g87e
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) June 25, 2024
‘एक दिवशी नक्कीच एखादी मुलगी म्हणेल की तिला दोन मुलांसोबत लग्न करायचं आहे आणि ती दोघांना खुश ठेवेल. तेव्हा किती लोक त्या मुलीची साथ देतील, ते मला पहायचंय. तेव्हा हेच सर्वजण सर्वांत आधी त्या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतील. एक समाज म्हणून आपण विनाशाच्या दिशेने जातोय. एखादी व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून एक चूक करत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपण तीच चूक पुढेसुद्धा केली पाहिजे. माझ्या दृष्टीकोनातून हे चुकीचं आहे आणि एकापेक्षा अधिक लग्न करणं पूर्णपणे चुकीचं आहे. हे भविष्यातही चुकीचंच असेल. मात्र आपण तरी काय करू शकतो? जोपर्यंत काहीजण स्वत: ते गोष्ट भोगणार नाहीत, तोपर्यंत त्यांना समजणार नाही. त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट’, अशा शब्दांत तिने सुनावलं आहे.