धर्माचं कारण देत अभिनयक्षेत्र सोडणारी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना ही ‘गुड न्यूज’ दिली. सना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून प्रेग्नंसीबाबत ती चाहत्यांसोबत विविध गोष्टी शेअर करत असते. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये सनाने दहा-बारा मुलांना जन्म घालण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. इतकंच नव्हे तर पोस्ट-पार्टम डिप्रेशनबाबत सनाने मांडलेल्या मतालाही नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. सनाने 2020 मध्ये ग्लॅमर विश्वाला रामराम केला होता आणि त्यानंतर तिने बिझनेसमन मुफ्ती अनस सैय्यदशी निकाह केला. गेल्या वर्षी तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता दीड वर्षातच ती दुसऱ्यांदा गरोदर आहे.
या व्हिडीओमध्ये सना म्हणते, “अर्थातच मला एकापेक्षा अधिक मुलबाळ असलेलं आवडेल. पाच असो किंवा दहा असो.. आधीच्या जमान्यात तर लोक 12-12 मुलं जन्माला घालायची. माझा पती अनसने प्रेग्नंसीदरम्यान माझी खूप काळजी घेतली होती. मुलाच्या डिलिव्हरीदरम्यान तर तो जवळपास बेशुद्धच झाला होता.” यापुढे सना पोस्ट-पार्टम डिप्रेशनबद्दलही तिचं मत मांडते. “जर तुम्ही स्वत:ला वारंवार हेच म्हणालात की डिप्रेशन आहे, तर कुठेतरी तुम्हाला ते खूप जास्त जाणवू लागेल. तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अध्यात्माकडे वळण्याचा प्रयत्न करा”, असा सल्ला ती देते.
सनाच्या या वक्तव्यांवरून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. ’10-12 मुलांना जन्माला घालणं हे इतकं सोपं आहे का?’, असा सवाल एकाने केला. तर ‘आजूबाजूला नॅनी आणि मोलकरीणी काम करायला असल्यावर तुला हे सर्व बोलणं खूप सोपं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘भारतासारख्या इतक्या लोकसंख्येच्या देशात दहा-बारा मुलं जन्माला घालण्याबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे’, असंही नेटकऱ्यांनी सुनावलंय.
सना खानचा पती गुजरातमधील सूरत इथला राहणारा आहे. मुफ्ती अनस सय्यद हा एक धार्मिक नेता आणि इस्लामिक विद्वान आहे. सनाची एजाज खानच्या माध्यमातून मुफ्तीशी भेट करून देण्यात आली होती. मुफ्ती अनस हा बिझनेसमनसुद्धा आहे. निकाहनंतर त्याने सनाला एक्सक्लुसिव्ह डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती. सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतरही तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात विविध ठिकाणी फिरताना पाहिलं गेलंय.