मुंबई | 31 जुलै 2023 : सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस’ हा शो टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळापासून चालत असलेला शो आहे. या शोचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 2006 मध्ये बिग बॉसचा पहिला एपिसोड टेलिव्हिजनवर प्रसारित झाला होता. गेल्या 17 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याला भरभरून प्रतिसाददेखील मिळत आहे. या 17 वर्षांत बिग बॉसच्या घराचं इंटेरिअर बऱ्याचदा बदललं आणि बरेच नवनवीन सेलिब्रिटी त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झाले. मात्र बिग बॉसची एकमेव गोष्ट बदलली नाही, तो म्हणजे आवाज. बिग बॉसच्या आवाजाविषयी आजही प्रेक्षकांमध्ये खूप कुतूहल आहे.
अतुल कपूर आणि विजय विक्रम सिंग हे दोघं बिग बॉसचा आवाज म्हणून ओळखले जातात. अतुल कपूर यांचा आवाज हा बहुतांश वेळी एखादी घोषणा करताना किंवा स्पर्धकांशी बिग बॉस संवाद साधताना ऐकायला मिळतो. ‘बिग बॉस चाहते है’ ही लोकप्रिय ओळ अतुल कपूर यांच्या आवाजातील आहे. तर प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट विजय विक्रम सिंग हे शोमध्ये वेळेचा उल्लेख करतात. ’31 जुलै, राज 8 बजे’, अशा वेळेच्या घोषणा विजय विक्रम सिंग यांच्या आवाजातील असतात.
अतुल कपूर यांचा जन्म 28 डिसेंबर 1966 रोजी लखनऊमध्ये झाला. गेल्या 31 वर्षांपासून ते व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत काम करत आहेत. लखनऊ विद्यापिठातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक भूमिकांना आपला आवाज दिला. मात्र बिग बॉसमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. तर विजय विक्रम सिंग यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1977 रोजी उत्तरप्रदेशमध्ये झाला. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्याआधी ते एका एमएनसीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करत होते. व्हॉइल मॉड्युलेशनमागीत गुंतागुंतीचा अभ्यास करण्यासाठी ते नंतर 92.7 बिग एफएममध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून रुजू झाले. ‘डान्स इंडिया डान्स’ या शोसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुल कपूर यांना बिग बॉसच्या प्रत्येक सिझनसाठी जवळपास 50 लाख रुपये मानधन मिळतं. तर विजय विक्रम सिंग हे प्रत्येक सिझनला 10 ते 20 लाख रुपये कमावतात.