‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा

| Updated on: Jan 13, 2025 | 1:29 PM

'बिग बॉस'च्या अठराव्या सिझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या शोची पूर्व विजेती शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने बिग बॉसच्या निर्मात्यांविषयी धक्कादायक दावा केला आहे.

बिग बॉसचे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा
Bigg Boss 18
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. त्यातही विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांपैकी एकाची जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. अशातच ‘बिग बॉस 11’ची विजेती आणि अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने बिग बॉसच्या विजेत्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस’चे निर्माते प्रेक्षकांना फसवतात, असं तिने म्हटलंय. शोचे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात, असाही दावा शिल्पाने केला आहे.

या व्हिडीओमध्ये शिल्पा म्हणते, “मला माहीत नाही, पण काही लोकांना हे समजलंय की निर्माते स्वत:च विजेता निश्चित करतात आणि स्वत:च त्याला विजेता बनवतात. ते स्वत:च्या घरातून उचलून आणतात आणि स्वत:च दाखवतात. चॅनलची स्ट्रॅटेजी आता लोकांना समजली आहे. म्हणून कदाचित आता बिग बॉसचा प्रेक्षकवर्ग कमी झालाय. तुम्ही एका मर्यादेपर्यंत लोकांची फसवणूक करू शकता, त्यानंतर नाही.” शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘बरोबर बोललीस शिल्पा, तू स्वत:लाच एक्सपोज केलंस. तुझ्यापेक्षा हिना खानला ट्रॉफी मिळायला हवी होती’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुझ्या सिझनमध्येही प्रेक्षकांची फसवणूक करून तुला विजेती बनवलं होतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. शिल्पा शिंदेनं बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. या सिझनमध्ये तिची अभिनेत्री हिना खानसोबत टक्कर होती. हिनाच या सिझनची विजेती ठरेल, असा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात होता. मात्र ऐनवेळी शिल्पा या शोची विजेती ठरली. आता शिल्पाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी पुन्हा एकदा हिनाच विजयास पात्र होती, असं मत व्यक्त करत आहेत.

‘बिग बॉस 18’मध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, चुम दरांग, शिल्पा शिरोडकर, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, चाहत पांडे आणि रजल दलाल हे आठ स्पर्धक राहिले आहेत. बिग बॉसचा हा नवीन सिझन 6 ऑक्टोबर 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.