मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पदार्थ बनवताना झालेल्या गमतीजमतीत ‘मला नेहमीच, मी नाही केलं त्याची शिक्षा मिळते’ अशी कोपरखळी पंकजा मुंडेंनी मारली. त्यामुळे पंकजांचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा रंगली आहे.
‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात तीन सेलिब्रिटी सहभागी होतात. दिग्गज अभिनेते प्रशांत दामले प्रत्येकाला एक-एक पदार्थ करायला सांगतात. त्यातून उत्तम पदार्थ बनवणारा सेलिब्रिटी त्या दिवसाचा विजेता ठरतो. पंकजा मुंडे यांना चिकन रस्सा ही रेसिपी करण्यास सांगितली होती. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य त्यांना दोन मिनिटांच्या अवधीत कार्यक्रमातील पेठेतून आणणं अपेक्षित होतं. मात्र रश्श्यासाठी लागणारं खोबरं आणायला पंकजा विसरल्या. शोच्या फॉर्मॅटनुसार ‘शेठ’ या व्यक्तिरेखेने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर विसरलेले साहित्य स्पर्धकांना दिलं जातं.
‘मला खोबरं मिळालं नाही, माझा मुख्य पदार्थच खोबरं आहे’ असं पंकजा मुंडे पदार्थ बनवताना म्हणाल्या. त्यावर, कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने ‘आपण खोबरं घेऊ’ असं सुचवलं. ‘तिथे मी खूप शोधलं’ असं उत्तर पंकजांनी दिलं. तेव्हा,
‘मग आता शिक्षा भोगून घेऊ’ असं संकर्षण म्हणाला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता ‘मला नेहमीच मी नाही केलं त्याची शिक्षा मिळते, ठीक आहे. माझं असंच आहे.’ असं पंकजा मिश्किलपणे म्हणाल्या. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
संकर्षणने पंकजा मुंडे यांना पुन्हा ‘मला नेहमीच मी नाही केलं त्याची शिक्षा मिळते’ याचा अर्थ काय ते सहज सांगा, असं विचारलं. ‘तेव्हा असंच आहे काय सांगू, खूप मोठा अर्थ आहे पुढच्या एपिसोडमध्ये सांगते’ असं पंकजांनी हसत हसत सांगितलं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्पर्धेचे नियम समजावून सांगताना राजशेफची भूमिका स्पष्ट करुन सांगितली. राजशेफ अर्थात मधुराज् रेसिपी फेम मधुरा बाचल स्पर्धकांना मदत करु शकतात. मात्र त्यांचे हात बांधलेले असणार, त्या प्रत्यक्ष पदार्थ बनवण्यात मदत करु शकणार नाहीत, केवळ सूचना देतील, थोडक्यात बाहेरुन पाठिंबा आहे, अशी मिश्कील टिपणी संकर्षणने केली. त्यावर बोलताना, ‘असं चालेल का रोहित? बाहेरुन पाठिंबा वगैरे’ असा तिरकस प्रश्न पंकजांनी विचारला. तेव्हा ‘आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’ असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.
‘ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, नवनवीन आमदारांना’ असंही रोहित पवार पंकजांना म्हणाले. त्यावर ‘मी तुम्हाला आमंत्रण द्यायला तयार आहे, तुम्हाला जे आवडतं, ते खाऊ घालायची माझ्याकडे कला आहे.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी लहानपणापासून आपल्याला एखाद्या कुकरी शोमध्ये सहभागी व्हायची आवड असल्याचं सांगितलं. ‘आमच्याकडे ज्योतिर्लिंग असल्याने आम्ही पूर्वी श्रावण पाळायचो. त्यावेळी मांसाहार करायचो नाही. गटारी अमावस्या हा मांसाहाराचा शेवटचा दिवस. काही वर्षांपूर्वी गटारी अमावस्येच्या रात्री मी घरी जात होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याचा फोन आला, की ताई मी तुम्हाला मस्तपैकी मटणाचा रस्सा पाठवून देतो. मी बरं म्हटलं. रात्री घरी पोहोचले आणि रश्श्यात मटण शोधत होते. तर एकही पीस सापडेना. मी त्याला फोन केला, तर म्हणतो, मी फक्त मटणाचा रस्सा म्हटलं होतं. त्यानंतर महिना भर त्याला सुनवत होते’ अशी धमाल आठवण पंकजांनी सांगितली.
संबंधित बातम्या :