मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमला नाही. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी या चित्रपटाबद्दल त्यांची बेधडक मतं मांडली आहेत. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ने आतापर्यंत भारतात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. मात्र चित्रपटाच्या या यशाला नसीरुद्दीन यांनी ‘धोकादायक ट्रेंड’ असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज तिवारी म्हणाले, “ते एक चांगले अभिनेते आहेत पण नसीरुद्दीन यांची नियत चांगली नाही. मनावर दगड ठेवून मला हे बोलावं लागतंय.”
“जेव्हा एखाद्या चित्रपटात एखादा मुलगा दुकानात बसला असताना मुलीबद्दल कमेंट करतो. तेव्हा नसीर साहेबांना काहीच बोलायचं नसतं. द केरळ स्टोरी आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट तथ्यांवर आधारित आहेत. जर त्यांना काही समस्या असेल तर त्यांनी कोर्टात जावं. बोलणं खूप सोपं असतं. त्यांनी ज्या पद्धतीने स्वत:ची ओळख करून दिली आहे, ती भारतीय म्हणून आणि माणूस म्हणून चांगली नाही”, असंही मनोज तिवारी म्हणाले.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. “भीड, अफवाह, फराझ यांसारखे दमदार चित्रपट फ्लॉप ठरले. कोणीच ते चित्रपट बघायला गेलं नाही. पण द केरळ स्टोरीसाठी लोक गर्दी करत आहेत. तो चित्रपट मी पाहिला नाही आणि पाहण्याची माझी इच्छाही नाही. कारण त्याबद्दल मी पुरेसं वाचलं आहे”, असं ते म्हणाले होते.
इतकंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या यशाला नसीरुद्दीन शाह ‘धोकादायक ट्रेंड’ असं म्हणाले होते. नाझी जर्मनीशी त्यांनी त्याची तुलना केली होती. “एका बाजूला, हा धोकादायक ट्रेंड आहे, त्यात काही शंका नाही. आपण नाझी जर्मनीच्या वाटेवर जात आहोत असं दिसतंय. जिथे हिटलरच्या काळात चित्रपट निर्मात्यांना सहनियुक्त केलं गेलं, तसं करण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकडून ते सर्वोच्च नेत्याची प्रशंसा करणारे चित्रपट बनवतील. त्या सर्वोच्च नेत्याने देशवासियांसाठी काय केलं आणि ज्यू समुदायाचं कशा पद्धतीने खच्चीकरण केलं हे त्यात दाखवू शकतील. जर्मनीतील अनेक मास्टर फिल्ममेकर्स ते ठिकाण सोडून हॉलिवूडला आले आणि तिथे त्यांनी चित्रपट बनवले. इथेही तेच होताना दिसतंय. एकतर उजव्या बाजूला रहा, तटस्थ राहा किंवा प्रस्थापितांच्या बाजूने व्हा”, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.