बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. सध्या बांगलादेशमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अशात पंतप्रधानांना आपल्याच देशातून पलायन करावं लागलं आहे. शेख हसीना यांना अवघ्या 45 मिनिटात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. बांगलादेशमध्ये जाळपोळ सुरु असताना शेख हसीना भारतात दाखल झाल्या आहेत. याचदरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुस्लीम देश आणि भारताबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे…’ असं कंगना म्हणाल्या.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगना रनौत म्हणाल्या, ‘आपल्या सभोवतालच्या सर्व इस्लामी प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी भारत आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधान यांना भारतात सुरक्षित वाटत आहे, ही आमच्यासाठी सम्मानित आणि आनंद देणारी गोष्ट आहे…’
पुढे कंगना म्हणाल्या, ‘पण प्रत्येक भारतीय विचार आहे की हिंदू राष्ट्र का? राम राज्य का? आता याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे मुस्लीम देशांमध्ये कोणी सुरक्षित नाही…. स्वतः मुसमान देखील त्यांच्या देशात सुरक्षित नाहीत…अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण रामराज्यात राहात आहोत…’ सध्या कंगना यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झाल तर, भाजप खासदार कंगना रनौत कायम हिंदू आणि हिंदुत्वाशी संबंधित मुद्द्यांवर परखडपणे स्वतःचं मत मांडताना दिसतात. मोदी सरकार भारतात आल्यापासून भारतात राम राज्याची स्थापना झाली… असा दावा देखील कंगना यांनी अनेकदा केला आहे. आता पुन्हा बांगलादेशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर ‘राम राज्यात राहत असल्यामुळे आम्ही भाग्यवान अहोत…’ असं वक्तव्य कंगना यांनी केलं आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून भारतात आल्या. शेख हसीना यांचं विमान राजधानी दिल्लीजवळील गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना काही दिवस भारतात राहतील आणि त्यानंतर त्या लंडनला रवाना होऊ शकतात… अशी माहिती समोर येत आहे.