नवी दिल्ली : अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सतीश हे होळीनिमित्त त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले होते. विकास मालू असं त्यांच्या मित्राचं नाव आहे. आता त्याच मित्राच्या पत्नीने विकास यांच्यावर सतीश यांना जीवे मारल्याचा आरोप केला आहे. 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली, असा धक्कादायक आरोप सान्वी मालूने केला आहे. सतीश यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं नाही, असा दावा तिने केला आहे. याप्रकरणी तिने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिने पती विकास मालूवर गंभीर आरोप केले आहेत.
‘2019 मध्ये माझं विकास यांच्याशी लग्न झालं. तेव्हापासून मी सतीश यांना ओळखते. ते नेहमी आमच्या दुबईतल्या घरी यायचे’, असंही तिने म्हटलंय. याविषयी पुढे तिने सांगितलं की, ‘एके दिवशी सतीश यांनी विकास यांच्याकडे 15 कोटी रुपये परत मागितले. त्यावेळी मीसुद्धा तिथेच होती. त्या दोघांमध्ये पैशांवरून बराच वाद झाला होता. तीन वर्षांपूर्वी विकास यांनी एका व्यवसायासाठी सतीश यांच्याकडून 15 कोटी रुपये उधार घेतले होते. मात्र ते पैसे त्यांनी कशातच गुंतवले नव्हते. जेव्हा कधी सतीश ते 15 कोटी रुपये परत मागायचे, तेव्हा विकास टाळाटाळ करायचे.’
भारतात परत येऊन पैसे परत देणार, असं आश्वासन विकास यांनी कौशिक यांना दिल्याचं सान्वीने सांगितलं. त्यावेळी सान्वीने विकास यांना पैशांबाबत विचारलं. कौशिक यांनी दिलेल्या 15 कोटी रुपयांचं काय केलं असं विचारलं असता विकास म्हणाले, “मी त्यांच्याकडून 15 कोटी रुपये उधार घेतले होते. मात्र कोविडमुळे ते पैसे बुडाले. आता मी त्यांना पैसे परत करणार नाही. एके दिवशी रशियन मुलींना बोलावून ब्ल्यू पिल्सचा ओव्हर डोस देईन. असाच मरून जाईल.”
याविषयी सान्वी पुढे म्हणाली, “गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जेव्हा सतीश यांनी पैसे परत मागितले, तेव्हा विकास संतप्त झाले होते. पैसे बुडाल्याचं मी आधीच सांगितलं ना, असं ते कौशिक यांना बोलू लागले. सतीश यांनी रोख रक्कम हाती दिल्याने त्यांच्याकडे कोणतेच पुरावे नसल्याचंही विकास म्हणाले. त्याच रात्री माझ्याशी बोलताना ते म्हणाले की, याचं काहीतरी करावं लागेल. नाहीतर हा शांत बसणार नाही.”
सान्वीने पतीवर ड्रग्ज तस्करीचाही आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर विकास मालू यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशीही संबंध असल्याचं तिने म्हटलंय. आपल्या तक्रारीसोबत तिने काही फोटोसुद्धा पोलिसांकडे सोपवले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या दिल्ली पोलीस करत आहेत.