मुंबई : 4 डिसेंबर 2023 | संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूरच्या करिअरमधील हा सर्वांधिक आकड्याने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणविजय सिंह आणि त्याचे वडील बलबिर सिंह यांच्यातील बिघडलेलं नातं आणि गँगस्टर विश्वाची एक वेगळीच बाजू दाखवली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर यांच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होतंय. त्याचसोबत अभिनेता बॉबी देओलने सर्वांचं विशेष लक्ष वेधलंय. यामध्ये त्याने अबरार हक् ही खलनायकी भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात त्याची भूमिका फारशी मोठी नव्हती. यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबीने मौन सोडलं आहे.
“चित्रपटात मी साकारत असलेला अबरार हा सूडासाठी पछाडलेला असतो. त्यामुळे ती भूमिका साकारताना मी माझ्या मनात कोणाचीच छवी निर्माण केली नाही. एखादा रानटी खलनायक कसा असतो, त्या हिशोबाने मी ही भूमिका साकारली. चित्रपटातील माझी भूमिका किती वेळ असेल याचा मी जराही विचार केला नव्हता. कारण भूमिका कितीही वेळाची असली तरी त्यात आपली वेगळी छाप सोडणं महत्त्वाचं असतं”, असं बॉबी म्हणाला. सप्टेंबर महिन्यात जेव्हा ‘ॲनिमल’चा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हापासून बॉबीच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र त्याला पुरेसा स्क्रीन टाइम मिळाला नसल्याची तक्रार काहींनी केली.
“भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते. या चित्रपटातील माझ्या भूमिकेला फार महत्त्व आहे. त्यात माझे आणखी माझे सीन्स असावेत अशी माझीही इच्छा होती. पण जेव्हा मी हा चित्रपट साइन केला होता, तेव्हाच मला स्पष्ट झालं होतं की ही भूमिका एवढीच असणार आहे. पण माझ्या आयुष्यात मला अशा प्रकारची भूमिका साकारायला मिळाली, यासाठी मी देवाचा आभारी आहे. मला फक्त 15 दिवस शूटिंग करावी लागणार आहे आणि संपूर्ण चित्रपटात मी नसेन हे मला माहीत होतं. पण त्यातही लोकांकडून माझ्यावर प्रेमाचा इतका वर्षाव होईल याची मला कल्पना नव्हती. हा खूपच वेगळा अनुभव आहे”, अशा शब्दांत बॉबी व्यक्त झाला.