कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल या भावंडांनी हजेरी लावली. या एपिसोडचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये देओल भावंडांनीही कपिल शर्मासोबत मस्करी केली. त्याचसोबत त्यांची भावनिक बाजूही पहायला मिळाली. बॉलिवूडमध्ये काम करताना देओल कुटुंबाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा, याविषयी बोलताना सनी आणि बॉबी भावूक झाले होते.
या प्रवासाबद्दल सनी देओल म्हणाला, “आम्ही 1960 पासून प्रकाशझोतात आलो पण गेल्या अनेक वर्षांत भरपूर प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला मनासारखं काम मिळत नव्हतं. नुकतंच माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर माझा ‘गदर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी वडिलांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आमच्यावर देवाची इतकी कृपा झाली, यावरच विश्वास बसत नव्हता. त्यानंतर ‘ॲनिमल’ आला सर्वच काही बदललं”
यावेळी सनीने वडिलांसोबतच्या नात्याविषयीही सांगितलं. “मी माझ्या वडिलांसोबत बसून मित्रासारखं गप्पा माराव्यात, अशी त्यांची इच्छा असते. पण मी त्यांना म्हणतो की जेव्हा मी तुम्हाला मित्रासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो, तेव्हा तुम्ही वडिलांसारखं वागायला लागता.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. यानंतर बॉबी देओल सांगतो की देओल कुटुंबीय खूप रोमँटिक आहेत. “आमचं मन भरत नाही”, असं तो म्हणतो.
2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूपच यशस्वी ठरलं होतं. आधी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर सनी देओलचा ‘गदर 2’ तुफान हिट झाला. 2023 या वर्षांतला हा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता. ‘गदर 2’च्या आधीही सनीने काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्याचप्रमाणे बॉबी देओलने ‘ॲनिमल’मध्ये साकारलेल्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.