मुंबई | 9 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. बॉलिवूडमध्ये सलमान खान याची असलेली जागा आजपर्यंत दुसरा कोणताही अभिनेता घेऊ शकलेला नाही. सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सलमान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण आता अभिनेता आणि भाऊ अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नानंतर सलमान खान देखील लग्न करणार? अशा चर्चा रंगत आहेत.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये खुद्द सलमान खान याने स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, भाईजान कुठे आणि कधी लग्न करणार याबद्दल देखील अभिनेत्याने सांगितलं आहे. नुकताच झालेल्या ‘विक एन्डका वार’ मध्ये अभिनेत्री तब्बू देखील आली होती.
‘बिग बॉस 17’ शोच्या ‘विक एन्डका वार’ मध्ये अनेक गोष्टींवर चर्चा करत तब्बू आणि समलान यांनी त्यांच्या लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी कौशल यांचं कौतुक करत तब्बू हिने आनंद व्यक्त केला. यावर सलमान खान म्हणाला, ‘दोघांनी अनेकदा सप्तपदी घेतल्या आहे. शोमध्ये एन्ट्री करण्याआधी देखील अंकिता – विकी यांनी सप्तपदी घेतल्या…’
सलमान याने लग्नाचा विषय काढल्यानंतर विकी विनोदी अंदाजात म्हणाला, ‘भाईने (सलमान खान) विचार केला, मी तर नाही करु शकत लग्न… तुम्हीच करुन घ्या…’ यावर तब्बू म्हणाली, ‘आम्ही तर नाही करणार लग्न. आमच्या आयुष्यातील सप्तपदी आम्ही दुसऱ्यांकडून करुन घेत आहोत… तुमच्या लोकांचं झालं आहे, पण आमचं बाकी आहे…’
‘बीग बॉस 17’ मध्ये सलमान खान म्हणाला, ‘आम्ही व्हिलचेअरवर लग्न करु आणि थेट अग्नीत प्रवेश करु… ‘ लग्नाबद्दल सलमान खान याचं वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येक जण पोट धरुन हासू लागला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान आणि तब्बू दोघे अविवाहित आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाज आणि शुरा यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले.