मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (salman khan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला ई-मेलच्या माध्यामातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे. सलमान खानला पाठवण्यात आलेल्या ई-मेलचं कनेक्शन यूके येथील असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ई-मेल आयडीवरून सलमान खानला हा मेल पाठवण्यात आला होता, तो यूकेमधील एका मोबाइल क्रमांकाशी जोडलेला असल्याचं समोर येत आहे. आता पोलीस याप्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. मोबाईल नंबर कोणाच्या नावाने रजिस्टर आहे? या गोष्टीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
गेल्या आठवड्यात सलमान खान याच्या ऑफिसमध्ये एक मेल पाठवण्यात आला होता. ज्यामध्ये अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रार रोहित गर्ग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामुळे सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाण्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे. शिवाय पोलिसांनी सलमान याला कोणत्याही कार्यक्रम सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय खान कुटुंबियांनी देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर, विनाकारण खान कुटुंबाला घराबाहेर पडण्यास देखील बंदी घातली आहे.
सलमान खान याच्यासोबतच अभिनेत्याच्या कुटुंबियांची देखील सुरक्षा वाढवली आहे. सलमान खान याचे वडील सलीन खान पूर्ण कुटुंबासोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. गँगस्टरच्या धमकीनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात सुरक्षा वाढण्यात आली आहे.
सलमानच्या मित्राने सांगितलं, “सलमान याच्या मते धमकी आणि धमकी देणाऱ्यावर आपण अधिक लक्ष देतोय असं त्याला वाटत आहे. यामुळे आपला प्लॅन यशस्वी ठरला असं त्याला वाटेल. मात्र सलमान खान निडर आहे. ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतात, त्या तेव्हा घडतात, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो सर्व गोष्टींचं पालन करतोय.’
लॉरेंस बिश्नोई याने याआधी देखील एका व्हिडीओमध्ये सलमान खान याला धमकी दिली होती. लॉरेंस बिश्नोई याने अनेकदा सलमानला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आता देखील लॉरेंस बिश्नोई याने सलमान याला मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून सलमानच्या पूर्ण कुटुंबाला सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.