मुंबई | 20 मार्च 2024 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाहीतर, मिथुन चक्रवर्ती आणि सलमान खान यांच्यातील नातं देखील सर्वांना माहिती आहे… मिथुन चक्रवर्ती यांनी अनेकदा सांगितलं आहे की, सलमान खान माझ्या कुटुंबाचा भाग आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने एक मजेदार किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सलमान खानने कशा प्रकारे सर्वांसमोर धमकावलं होतं याबद्दल नमाशी याने सांगितलं आहे. सध्या सर्वत्र नमाशी आणि सलमान यांची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नमाशी म्हणाला, ‘सलमान भाई तेव्हा ‘राधे’ सिनेमाची शुटिंग करत होता. मी देखील ‘बॅड बॉय’ सिनेमाची शुटिंग पूर्ण केली होती. मी सलमान भाईला भेटण्यासाठी मेहबूब स्टुडिओमध्ये गेलो. मी तेथे गेलो समोर सलमान भाई उभा होता… मी त्याच्या समोर गेलो आणि त्याच्या पाया पडलो…’ पुढे झालेले विनोद सांगत नमाशी म्हणाला, ‘मला त्याने धमकी दिली…’
‘सलमान भाई मला म्हणला, सर्वांत आधी येथून निघ… मी तुझ्या इतकाच वृद्ध आहे, माझ्यासोबत असं काहीही करु नकोस… जर तू पुन्हा असं केलंस, विशेषतः दिशा पटानी याठिकाणी असताना, तर तुला मी सेटच्या बाहेर फेकून देईल…’ सध्या सर्वत्र नमाशी आणि सलमान यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.
पुढे नमाशी म्हणाला, ‘सलमान भाई मला भेटला आणि म्हणाला पुढे कधीही तुला मला भेटायचं असेल, तर एक नियम पाळावा लागेलच आणि तो नियम म्हणजे सलमान खानच्या कधीही पाया पडायचं नाही…’ असं देखील नमाशी म्हणाला.
नमाशी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, नमाशी याने 2023 मध्ये ‘बॅड बॉय’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. आता नमाशी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांच्यासोबत नव्या सिनेमात काम करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यानंतर आणि त्यांचा मुलगा नमाशी याला देखील चाहते मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.