बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नुकतंच लोकसभा निवडणुकीत विजयी झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना राणावत विजयी झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील खासदार आज राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. सध्या नव्या खासदारासांठी शासकीय निवासस्थानांचं वाटप करण्यात आलेलं नाही. संसदेच्या पहिल्या अधिवेशनात आज अनेक नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली आहे. खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर खासदारांना त्यांचं शासकीय निवासस्थान मिळणार आहे. पण तोपर्यंत नवनिर्वाचित खासदारांना दिल्लीत आपल्या राहण्याची व्यवस्था करायची आहे. अभिनेत्री कंगना हिचं गाव हिमाचलचं मंडी आहे. तर तिची कर्मभूमी मुंबई आहे. त्यामुळे तिचं महाराष्ट्रावरही तितकंच प्रेम आहे. विशेष म्हणजे ती दिल्लीत तात्पुरत्या निवासासाठी महाराष्ट्र सदनात मुक्काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
कंगना राणावत आज खासदारकीची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनात दाखल झाली. कंगना यापुढे दिल्लीतील वास्तव्यासाठी महाराष्ट्र सदनातील रूमची चाचपणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनाला पसंती असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कंगना राणावतने महाराष्ट्र सदनला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझं महाराष्ट्राशी वेगळं नातं आहे, असं ती यावेळेला म्हणाली. महाराष्ट्र सदन खूप सुंदर आहे. माझे काही इतर मित्र इथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी इथे आले होते, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. यावेळी कंगनाला महाराष्ट्र सदनमध्ये काही दिवस राहणार असल्याची चर्चा आहे. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनाने रूम्सची पाहणी केली. मात्र, तिने त्याबाबत बोलायला नकार दिला आहे.