चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत खळबळजनक बातमी येताना दिसत आहे. या बातमीनंतर सर्वांनाच मोठा धक्का लागल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्री काजोल हिच्यासोबत वेब सीरिज द ट्रायलमध्ये काम करणाऱ्या नूर मालाबिका दास या अभिनेत्रीचे निधन झालंय. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसलाय. मालाबिका दास हिने आत्महत्या केल्याचे सांगितले जातंय. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात काही मोठे खुलासे देखील केले जाऊ शकतात. पोलिसांनी लोखंडवाला येथील फ्लॅटमधून तिचा मृतदेह ताब्यात घेतलाय.
नूर मालाबिका दास हिने बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलीये. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. शेजारील फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. ओशिवरा पोलिस आता याप्रकरणातील तपास करत आहेत. नूर मालाबिका दास हिने आत्महत्या का केली, याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीये.
सर्वात हैराण करणारे म्हणजे अभिनेत्रीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये गेल्यावर पोलिसांना नूर मालाबिका दास हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. अभिनेत्रीच्या कुटुंबियांपैकी कोणीही मुंबईत राहत नसल्याची देखील माहिती मिळत आहे. नूर मालाबिका दास हिने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नूर मालाबिका दास ही मुळची आसामची रहिवाशी आहे. अभिनयाचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच नूर मालाबिका ही मुंबईत दाखल झाली. अनेक हिंदी चित्रपटांसोबतच नूरने वेब सीरिजमध्येही हिट भूमिका केल्या. नूर मालाबिका दास ही 32 वर्षांची असून तिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावरही नूर सक्रिय दिसत होती.
रिपोर्टनुसार पोलिसांनी नूर मालाबिका दास हिच्या कुटुंबियांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू तिच्या कुटुंबियांपैकी कोणीही तिचा मृतदेह घेण्यास पोहचले नाही. शेवटी पोलिसांनी एका एनजीओच्या मदतीने अभिनेत्रीच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. अभिनेत्रीचा कुटुंबियांसोबत वाद असल्याची चर्चा देखील रंगताना दिसत आहे.