Paparazzi Culture: सेलिब्रिटींच्या एकेका फोटोमागे बक्कळ पैसा.. ‘पापाराझी कल्चर’ म्हणजे काय रे भाऊ?

| Updated on: Jun 21, 2024 | 12:34 PM

जिम, रेस्टॉरंट, सलून, पब, एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करणाऱ्या 'पापाराझीं'चं महत्त्व हल्ली खूप वाढलंय. हे पापाराझी कसं काम करतात, त्यामागे आर्थिक गणित काय, सेलिब्रिटींशी त्यांच नातं कसं आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

Paparazzi Culture: सेलिब्रिटींच्या एकेका फोटोमागे बक्कळ पैसा.. पापाराझी कल्चर म्हणजे काय रे भाऊ?
पापाराझी कल्चर
Image Credit source: Instagram
Follow us on

सेलिब्रिटी म्हटलं की त्या व्यक्तीच्या भोवती असामान्यतेचं मोठं वलय आपोआप निर्माण होतं. सोप्या शब्दांत बोलायचं झालं तर सर्वसामान्यांच्या हाती न लागणारे, सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगणारे आणि मुख्यत: त्यांच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीविषयी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल असणं. एक काळ असा होता, जेव्हा या सेलिब्रिटींचा एक फोटो मिळवण्यासाठी किंवा त्यांचे खास फोटोशूट पाहण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांना पैसे खर्च करावे लागायचे. प्रसिद्ध मॅगझिन, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्येच त्यांचे खास फोटो पहायला मिळायचे. मग चाहते त्याचीच कात्रणं स्वत:कडे जपून ठेवायचे. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी मग फोटोग्राफर्सची डिमांड वाढत गेली. इंडस्ट्रीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच फ्रिलान्स फोटोग्राफर होते, जे सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करायचे आणि त्या फोटोंना खूप मागणी असायची. बॉलिवूड सेलिब्रिटींची क्रेझ केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड होती, किंबहुना अजूनही आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधून जेव्हा कोणी ठराविक दिवसांसाठी भारतात यायचे, तेव्हा ते आवर्जून अशा फ्रिलान्स फोटोग्राफर्सकडून पैसे देऊन शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रिटींचे फोटो विकत घ्यायचे. या फोटोग्राफर्सचं सेलिब्रिटींसोबतही एक चांगलं नातं निर्माण झालं होतं. सेलिब्रिटी स्वत: सेटवर किंवा इतर ठिकाणी त्यांची वैयक्तिक भेट घ्यायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे. 2000 च्या नंतर या गोष्टी बऱ्याच बदलत गेल्या. फोटोग्राफर्स सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो क्लिक करू लागले. जसजसं हे विश्व डिजिटल होऊ लागलं, सोशल मीडियाचा वापर वाढू लागला.. तसं या फोटोग्राफर्सना वेगळं महत्त्व प्राप्त झालं. हेच फोटोग्राफर्स आता ‘पापाराझी’ म्हणून ओळखले जातात.

‘पापाराझी’ म्हणजे काय रे भाऊ?

गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘पापाराझी कल्चर’ प्रचंड वाढल्याचं पहायला मिळतंय. आता हे पापाराझी म्हणजे सर्वसामान्य भाषेत बोलायचं झाल्यास फोटोग्राफर्सच असतात. फक्त सध्याच्या डिजिटल विश्वात त्यांना ही वेगळी ओळख मिळाली आहे. सेलिब्रिटी जिमला जाताना किंवा येताना दिसले, एखाद्या रेस्टॉरंटबाहेर दिसले किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले की त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे पापाराझी क्लिक करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर त्यांचे खास ‘व्हेरिफाइड’ अकाऊंट्स आहेत आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा हा लाखोंमध्ये आहे. वीरल भयानी, मानव मंगलानी, वरिंदर चावला हे स्वत: एकेकाळी सेलिब्रिटी फोटोग्राफर होते आणि आता त्यांची एक टीम ‘पापाराझी’ म्हणून काम करते. सेलिब्रिटी ज्या रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा ज्या सलून आणि जिममध्ये जातात.. तिथेच पापाराझी कसे पोहोचतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेकदा पडतो. तर या सगळ्यामागे ‘पापाराझीं’ची एक मोठी यंत्रणा काम करते. याला ‘यंत्रणा’ हा शब्द का वापरला गेलाय, हे तुम्हाला या लेखातपुढे समजेलच. बॉलिवूड इंडस्ट्रीत हे पापाराझी कल्चर कसं सुरू झालं, ते कशा पद्धतीने वाढत गेलं, पापाराझींचं काम कसं चालतं, सेलिब्रिटींचे फोटो किंवा व्हिडीओ शूट केल्यामुळे त्यांना किती पैसे मिळतात या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या लेखात मिळतील.

हे सुद्धा वाचा

‘पापाराझी कल्चर’ची सुरुवात

बॉलिवूड इंडस्ट्रीत पापाराझी कल्चरला सर्वाधिक खतपाणी सोशल मीडियामुळेच मिळालं. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सनी सोशल मीडियावर त्यांनी क्लिक केलेले विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्याला नेटकऱ्यांकडून प्रतिसाद मिळू लागला. मग हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं. हे सेलिब्रिटी एअरपोर्टला कोणते कपडे घालून जातात, जिमला कसे जातात, रेस्टॉरंटमध्ये कसे जातात.. हे सर्व नेटकऱ्यांना पापाराझींच्या अकाऊंटवर दिसू लागलं. जसजसा नेटकऱ्यांकडून प्रतिसाद वाढत गेला, तसतशी पापाराझींमध्येच स्पर्धा सुरू झाली. मग ते सेलिब्रिटींचा पाठलाग करू लागले, त्यांच्या कारचा पाठलाग करू लागले आणि ते जिथे जातील तिथे कॅमेरा घेऊन त्यांच्यासमोर उभे राहिले. गेल्या काही वर्षांत हे पापाराझी कल्चर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय, की त्याचा आता सेलिब्रिटींनाही त्रास होऊ लागला आहे. मात्र यामागचं आर्थिक गणित समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

पापाराझींची मोडस ऑपरेंडी

एकेकाळी फ्रिलान्स सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांनी आता पापाराझींची एक मोठी टीमच तयार केली आहे. ‘वीरल भयानी’, ‘मानव मंगलानी’, ‘वरिंदर चावला’ यांसारख्यांच्या हाताखाली काम करणारे हे पापाराझी विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करतात. सेलिब्रिटींचा पाठलाग करण्यासाठी त्यांना बाईक दिली जाते. काही जण सेलिब्रिटींच्या घराबाहेरच तासनतास त्यांची प्रतीक्षा करतात. तर पापाराझींची एक टीम 24 तास एअरपोर्टवर असते. एअरपोर्टवर कधीही कोणतीही सेलिब्रिटी दिसू शकते, म्हणून तिथे शिफ्टमध्ये काम करणारे पापाराझी नेमले जातात.

 

कोणती सेलिब्रिटी कुठे आहे, याची माहिती त्यांना ‘टिप्स’च्या माध्यमातून मिळते. यासाठी रेस्टॉरंटमधील कर्मचारी, हॉटेल स्टाफ मेंबर्स, सेलिब्रिटींची पीआर टीम, मॅनेजर यांच्याकडून त्यांना टिप्स मिळतात आणि मग त्याठिकाणी ते आपले कॅमेरे घेऊन पोहोचतात. एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन असेल तर अशा वेळी सेलिब्रिटींची पीआर टीम स्वत: त्यांना फोन करून बोलावते. अनेकदा हे पापाराझी सेलिब्रिटींच्या कारचे नंबर पाठ करून ठेवतात आणि त्या कारचा पाठलाग करतात. मोठमोठ्या सेलिब्रिटीची एक झलक टिपण्यासाठी त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. शाहरुख खान हा त्यापैकीच एक आहे. त्याच्यासाठी कधी कधी 24 ताससुद्धा प्रतीक्षा करावी लागते.

भिकाऱ्यांकडूनही मिळते ‘टिप’

यामध्ये सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे मुंबईतल्या भिकाऱ्यांकडूनही या पापाराझींना सेलिब्रिटींबद्दलचे टिप्स मिळतात. पापाराझो वरिंदर चावला यांनी एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला आहे. रस्त्यावरील भिकाऱ्यांना एखाद्या रेस्टॉरंटबाहेर किंवा इतर कुठेही हे सेलिब्रिटी दिसले, की ते पापाराझींच्या स्टाफला कॉल करून सांगतात. त्यांच्याकडे पापाराझींच्या स्टाफचे मोबाइल नंबर्स सेव्ह केलेले आहेत.

पापाराझींचं आर्थिक गणित

सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ शूट करणाऱ्या या पापाराझींचं आर्थिक गणित सर्वसामान्यांना थक्क करणारं आहे. एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो मिळवण्यासाठी ते इतकी मेहनत का करतात किंवा इतकी रिस्क का घेतात, या प्रश्नाचं उत्तर त्यांचं आर्थिक गणित देऊ शकेल. सोशल मीडिया नसताना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोटो मिळवण्यासाठी चाहते खूप पैसे मोजायचे. मात्र आताचं पापाराझींचं गणित थोडं वेगळं आहे. त्यांना सेलिब्रिटीच्या एका फोटो आणि व्हिडीओमागे पैसे मिळतात. काहींचे पॅकेजेस ठरलेले असतात. काहींची वृत्तसंस्थाशी करार असतो आणि त्यानुसार त्यांना पैसे दिले जातात. शिवाय सोशल मीडियाद्वारे त्यांची बरीच कमाई होते.

प्रत्येक सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेनुसार त्याचं रेट कार्डही ठरलेलं असतं. शाहरुखच्या फोटोंसाठी पापाराझींना सर्वाधिक पैसे मिळतात. त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रियांका चोप्रा जेव्हा जेव्हा भारतात येते, तेव्हा तिच्या फोटोंना प्रचंड मागणी असते. प्रियांका ही ग्लोबल स्टार असल्याने तिच्या फोटोंना जगभरात खूप मागणी असते. तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींना चांगले पैसे मिळतात. या सेलिब्रिटींचे व्हिडीओ ते युट्यूब चॅनलवरही अपलोड करतात. युट्यूबच्या माध्यमातूनही त्यांची कमाई होते.

पापाराझी अकाऊंट इन्स्टाग्राम फॉलोअर्स युट्यूब सबस्क्राइबर्स
वीरल भयानी 10.7 दशलक्ष 5.75 दशलक्ष
वरिंदर चावला 4.7 दशलक्ष 7.9 दशलक्ष
मानव मंगलानी 5.8 दशलक्ष 1.08 दशलक्ष

सेलिब्रिटींचे एक्स्लुसिव्ह फोटो किंवा व्हिडीओ सर्वांत आधी मिळवण्यासाठी या पापाराझींमध्येही प्रचंड स्पर्धा आहे. कोणतीही घटना आपल्याकडून राहू नये, यासाठी त्यांची टीम सतत अलर्ट असते. यासाठीच एअरपोर्टवर ते पूर्ण वेळ पापाराझी ठेवतात.

पापाराझींवरील सेलिब्रिटींचा राग

पापाराझी कल्चर वाढल्यापासून सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातही ढवळाढवळ वाढल्याच्या अनेक तक्रारी आहेत. याविरोधात अनेक सेलिब्रिटींनी आवाजसुद्धा उठवला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट जेव्हा तिच्या घरातील बाल्कनीत बसली होती, तेव्हा एकाने हळूच तिचा व्हिडीओ शूट केला होता. याविरोधात तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी पापाराझींना विनंती करून त्यांची मुलगी वामिकाचे फोटो क्लिक करण्यास मनाई केली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीसुद्धा सुरुवातीच्या काळात त्यांच्या मुलीबद्दल हेच पाऊल उचललं होतं. अभिनेत्री राणी मुखर्जीने तर थेट पापाराझींना धमकीच दिली होती. माझ्या मुलीचे फोटो क्लिक केले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन असं तिने म्हटलं होतं.

काही सेलिब्रिटींनी पापाराझींवर चुकीच्या अँगलने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करताना शरीराच्या ठराविक भागांना झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं, असा त्यांचा आक्षेप आहे. जान्हवी कपूर, मृणाल ठाकूर यांसारख्या सेलिब्रिटींनी थेट कॅमेरासमोर ही तक्रार बोलून दाखवली आहे. जान्हवीने जिमजवळ येण्यास पापाराझींना मनाई केली आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खानची एकेकाळी सोशल मीडियावर खूप क्रेझ होती. तैमुरच्या फोटो आणि व्हिडीओंना खूप डिमांड असल्याचं पाहून पापाराझीसुद्धा घराबाहेर तासनतास त्याची प्रतीक्षा करायचे. तो शाळेत किंवा ट्युशनला जात असताना त्याचा पाठलाग करायचे. एकेदिवशी तैमुर ट्युशनला जात असताना जवळपास 40 ते 50 पापाराझी बाईकवरून त्याच्या कारचा पाठलाग करत होते. या घटनेनं तैमुरची नॅनीसुद्धा घाबरली होती. अखेर सैफने फोन करून पापाराझींना विनंती केल्यानंतर त्यांनी शाळेत किंवा ट्युशनला जाताना त्याचा पाठलाग करणं बंद केलं.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आल्यानंतर पापाराझी आणि मीडियाने ज्याप्रकारे काम केलं, त्यावर अभिनेता शाहरुख खानचीही नाराजी असल्याचं पापाराझी वरिंदर चावलाने बोलून दाखवलं. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख पापाराझींना त्याचे फोटो क्लिक करण्याची संधी देतच नाही. इतकंच नव्हे तर त्या प्रकरणापासून शाहरुखने त्याच्या कारला काळ्या रंगाचे काच लावून घेतले आहेत. मात्र सेलिब्रिटींनी विनंती केल्यावर काही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर काढून टाकत असल्याचंही चावलाने स्पष्ट केलं. एखादा व्हिडीओ सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा असेल, तर तो पोस्ट न करण्याबाबतचा निर्णय ते विचार करून घेत असल्याचं, त्याने सांगितलं.

बच्चन कुटुंबीयांवरील बहिष्काराचा किस्सा

कामाच्या बाबतीत पापाराझींच्या या टीममध्ये एकता असल्याचंही पहायला मिळतं. या एकतेचं उदाहरण द्यायचं झालं तर सर्व पापाराझी आणि फोटोग्राफर्सनी मिळून एकेकाळी बच्चन कुटुंबीयांवर मोठा बहिष्कार टाकला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाच्या वेळचा हा किस्सा आहे. त्यावेळी त्यांनी कोणत्याच मीडियाला कव्हरेजचची परवानगी दिली नव्हती. मात्र तरीही काही पापाराझींनी भिंतीवरून, गेटवरून फोटो घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका राजकीय व्यक्तीची गाडी आल्यानंतर पापाराझींना अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती. काहींना दुखापतसुद्धा झाली होती. त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेनंतर पापाराझींनी बच्चन कुटुंबीयांवर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. “मी माझ्या आयुष्यात इतका मोठा बहिष्कार कधीच पाहिला नव्हता”, असं वरिंदर चावला सांगतात. त्या घटनेनंतर बच्चन कुटुंबीय कुठल्याही कार्यक्रमात दिसले तरी त्यांचे फोटो काढले जात नव्हते. खुद्द अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात पोहोचले तेव्हा, सर्व फोटोग्राफर्सनी त्यांचे कॅमेरे वर धरले आणि फोटो काढण्यास मनाई केली होती. ग्रुप फोटो काढताना बिग बी बाजूला झाल्यानंतर ते इतरांचे फोटो क्लिक करायचे. अखेर पापाराझींची नाराजी दूर करण्यासाठी बिग बींनी सर्व फोटोग्राफर्सना एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. त्या मिटींगनंतर बच्चन कुटुंबीयांवरील बहिष्कार हटवण्यात आला होता. त्यामुळे पापाराझींनी मिळून ठरवलं तर ते एखाद्या सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेवरही मोठा परिणाम आणू शकतात.

 

पापाराझींमुळे बनले सेलिब्रिटी

पापाराझींमुळे काही सेलिब्रिटींची लोकप्रियता वाढली तर काही जण पापाराझींमुळेच सेलिब्रिटी बनले. उर्फी जावेद, ऑरी, शर्लिन चोप्रा यांसारख्याना पापाराझींमुळे सोशल मीडियावर ओळख मिळाली. उर्फी जेव्हा चित्रविचित्र कपडे परिधान करून पापाराझींसमोर यायची, तेव्हा तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल व्हायचे. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातंय हे पाहून तिनेसुद्धा कपड्यांच्या बाबतीत आणखी प्रयोग केले. मिळणारी प्रसिद्धी ही सकारात्मक असो किंवा नकारात्मक.. ती प्रसिद्धीच असते.. असा नियम उर्फी, शर्लिन, राखी सावंत यांना लागू झाला. म्हणूनच त्यांनीही या ‘पापाराझी कल्चर’चा पुरेपूर फायदा उचलला, असं म्हणायला हरकत नाही.