मुंबई : काल जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमचाही (singer sonu nigam) समावेश आहे. भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर सोनू निगमने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा पद्मश्री पुरस्कार ( padmshree award) आपण आपल्या आईला सपर्पित करत असल्याचं सोनूने म्हटलंय.
सोनू निगमची प्रतिक्रिया
सोनूने पद्मश्री मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या जडणघडणीत माझी आई शोभा निगम हिचा खूप मोलाचा वाटा आहे. तिने लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार केले त्याचमुळे मी हा पुरस्कार घेण्यासाठी पात्र ठरलो. मला हा मिळालेला सन्मान मी माझी आई आणि माझे शिक्षक यांना समर्पित करतो. आज ती इथे असती तर तिला खूप आनंद झाला असता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असते. तिला माझ्या कामाचं कायम कौतुक वाटत राहिलं. आज ती खूप खूश झाली असती. मी आज जे काही आहे ते माझ्या आईमुळेच आहे. त्यामुळे मी तिला हा पुरस्कार समर्पित करतो’, असं सोनू म्हणाला आहे.
सोनू निगमने चाहत्यांचे मानले आभार
सोनू निगमने आपले चाहते आणि घरातील लोकांचे आभार मानले आहेत. ‘मी माझ्या आई आणि वडिलांचे आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर मी माझ्या गुरुंना वंदन करतो. आज मला जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्या आशिर्वादानेच मी आज हा पुरस्कार मिळवू शकलो. तसंच माझे मित्र, माझे सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकलो. तसंच मी माझ्या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळेच मी हे यश मिळवू शकलो’, असं सोनू म्हणाला आहे.
सोनू निगमची निवडक गाणी
सोन निगमने बॉलिवूडला एकापेक्षा एक गाणी दिली. त्याची गाणी आणि त्याचा आवाज भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्याने हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 2003 साली सोनू निगमला ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शीर्षकासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सोनू निगमने आमिर खानच्या पीके चित्रपटातील ‘भगवान है कहाँ से तू’ हे गाणं गायलं होतं, तर दुसरीकडे अग्निपथ चित्रपटातील ‘अभी मुझे मैं कही’ हे गाणंही चाहत्यांना आजही भावतं. याशिवाय ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘सूरज हुआ मद्दम’ हे गाणे आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं.
संबंधित बातम्या