मुंबई : लग्नाच्या 15 वर्षानंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan Kiran Rao Divorce) आणि किरण राव यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. आमिर आणि किरण यांनी एक संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. दोघांनीही आपल्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करू इच्छित असल्याचं त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र, पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि कुटुंब म्हणून एकमेकांसोबत राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे. आता या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण एकेकाळी आमिर खाननं किरण रावसाठी पहिली पत्नी रीना दत्तापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
चाहत्यांना प्रश्न पडला आहे की दोघांमध्ये असं काय घडलं ज्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आमिर खान आणि किरण राव यांच्या या घटस्फोटामुळे त्यांची प्रेमकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की दोघांची प्रेमकहानी कशी सुरू झाली आणि मग हे नाते लग्नापर्यंत कसं पोहोचलं.
आमिर खान-किरण राव यांची पहिली भेट
किरण राव आणि आमिर खानची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. किरणच्या आधी आमिर खाननं रीना दत्ताशी लग्न केलं होतं. मात्र, रीना आणि आमिर खानचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. ज्यानंतर किरणच्या रूपानं आमिर खानला त्याचं दुसरं प्रेम मिळालं. आमिर खाननं स्वत: किरण रावसोबतच्या आपल्या प्रेमकथेविषयी खुलासा केला होता.
लग्नापुर्वी दीड वर्षे सोबत
एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते – ‘2001 मध्ये मी लगान चित्रपट करत असताना मी किरणला भेटलो. तेव्हा ती असिस्टंट डायरेक्टर होती. त्यावेळी आमच्यात काही संबंध नव्हता. मात्र, घटस्फोटानंतर मी पुन्हा तिला भेटलो. एक दिवस मला तिचा फोन आला आणि आम्ही अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तिच्यासोबत बोलताना खूप आनंदीत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटू लागलो. लग्नाआधी आम्ही जवळपास दीड वर्षे एकत्र राहिलो आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.’
किरण शाही कुटुंबातील
किरण राव ही शाही कुटुंबातील आहे. तिचे आजोबा वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी हे तेलंगणा राज्यात आहे. किरण ही आदिती राव हैदरीची बहीण आहे. आदितीही शाही कुटुंबातील आहे.
2005 मध्ये दोघांचं लग्न
2005 मध्ये आमिर खाननं किरण रावशी लग्न केलं होतं. दोघांनाही एक मुलगा आहे. ज्याचे नाव आझाद आहे. किरण बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माती आहे. तिने सिक्रेट सुपरस्टार, पीपली लाईव्ह, दंगल, तलाश आणि जाने तू या जाने ना … अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र, लग्नाच्या 15 वर्षानंतर आता दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ज्यामुळे दोघांचे चाहते खूप दु:खी झाले आहेत.
संबंधित बातम्या
Aamir Khan Kiran Rao Divorce: घटस्फोट शेवट नव्हे, नवी सुरुवात, आमिर खान-किरण रावचं पत्र जसंच्या तसं!