मुंबई : ‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपलपैकी एक आहेत. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यावरून नजर हटवूच शकत नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक पूर्वी खूप चांगले मित्र होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक पहिल्यांदा 1999 मध्ये त्यांच्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या फोटोशूट दरम्यान भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ढाई अक्षर प्रेम के’ हा पहिला चित्रपट आम्ही एकत्र केला होता. त्यावेळी ऐश्वर्याला पाहून मी तिच्यासाठी वेडाच झालो होता.
मात्र, प्रेम सुरू होण्यापूर्वीच दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. या चित्रपटानंतर दोघेही रमेश सिप्पी यांच्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र दिसले. मात्र, ‘उमराव जान’ या चित्रपटातून दोघांमधील प्रेमाची सुरुवात झाली. अभिषेकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यावेळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी विश्वालाच आम्हा दोघांना एकत्र आणायचे होते.
2007 मध्ये अभिषेक त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीत बसून अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्नाचा विचार केला. यानंतर त्याने ठरवले की, तो ऐश्वर्याला आता लग्नासाठी विचारणार आहे.
या प्रपोजलचे वर्णन करताना अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी न्यूयॉर्कमध्ये माझ्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, तेव्हा मी माझ्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत बसलो होतो, तेव्हा माझ्या मनात आले की, माझे आणि ऐश्वर्याचे लग्न झाले तर कसे? ते चांगले होईल का? यानंतर मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत नेले आणि तिला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का?’
ऐश्वर्यानेही लगेच होकार दिला आणि 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. दोघांचे लग्न एखाद्या शाही लग्नापेक्षा कमी नव्हते. या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर 2011 मध्ये दोघेही आराध्याचे पालक झाले.
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची खास गोष्ट म्हणजे दोघेही नेहमीच एकमेकांचा आदर आणि समर्थन करतात. अनेकवेळा दोघांपैकी एकाला ट्रोल केले जाते तेव्हा दुसरा त्याला उत्तर द्यायला नेहमीच तयार असतो.