राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून…

| Updated on: Sep 21, 2024 | 5:48 PM

नाम फाऊंडेशनचा आज नववा वर्धापन दिन होता. या निमित्ताने आज पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर या दोन्ही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधत नाम फाऊंडेशनच्या कामाची माहिती दिली.

राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून...
Nana Patekar
Follow us on

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या राजकारणात येण्याच्या नेहमीच चर्चा सुरू असतात. कधी नाना पाटेकर लोकसभा लढवणार, तर कधी नाना अमूक पक्षात जाणार अशा बातम्या येत असतात. पण आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. राजकारणात येणार नाही, असं नाना पाटेकर सातत्याने सांगत असतात. आजही नाना पाटेकर यांना तुम्ही राजकारणात येणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिलं. मी राजकारणात येणार नाही. तो माझा पिंडच नाही, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं. आज पुण्यात नाम फाऊंडेशनचा नववा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने ते मीडियाशी संवाद साधत होते.

राजकारण हा माझा पिंड नाही. नाम फाऊंडेशनच्या कुणाचाही नाही. मी कधीच राजकारणात जाणार नाही. राजकारण्यांशी मैत्री करा. पण कुणाशी मैत्री करायची, कुणाशी नाही हेही कळायला पाहिजे. सर्वच वाईट आहेत असं नाही. सर्वच चांगले आहेत, असंही नाही. पण खूप चांगली मंडळी आहे राजकारणात आहे, असं नाना पाटेकर म्हणाले.

मला पक्षातून काढून टाकतील

राजकारणात मी जात नाही, कारण मला पटलं नाही तर मी बोलतो. बेधडक बोलण्याच्या माझ्या सवयीमुळे मला त्यांच्या पक्षातून काढून टाकतील. इथे तुम्ही गप्प राहिलं पाहिजे. पण तेच मला जमत नाही. आमची (नाममध्ये) किती भांडणं होतात. भांडणं होत नसतील तर मित्र कसले तुम्ही? असा सवाल नाना यांनी केला.

माझी सर्वांशी मैत्री

आजच्या राजकारण्यांविषयी काय सांगाल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर नानांनी थेट बोलण्यास नकार दिला. माझी सर्वांशी मैत्री आहे. मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाही. आम्ही आमच्या कामाचा वसा घेतला आहे. त्याबद्दल बोला. दुसऱ्यांच्या कामावर बोलण्याचा मला काहीच हक्क नाही. शरद पवार मोठे राजकारणी आहेत. अजित पवार मोठं काम करत आहेत. उद्धव ठाकरे मोठं काम करतात. शरद पवार असतील, अजितदादा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि इतर राजकारणी असतील. या सर्वांशी माझी चांगली मैत्री आहे. पण त्यांच्या कामावर बोलण्याचा मला अधिकार नाही. तो माझा प्रांत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

स्वामिनाथन आयोग लागू करा

यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नामच्या कामाची माहिती दिली. समाजात समाजाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलने होतात. माणसाने माणसासाठी चालवलेली ही चळवळ आज लोक चळवळ झाली. आम्ही कुणावरही टीका न करता, कुणावरही वितुष्ट न धरता आमचं काम सुरू ठेवलं. राज्यातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाचा लाभ झाला तर आम्ही 9 वर्ष जे काम केलं त्याचं फलित मिळालं असं समजू, असं मकरंद अनासपुरे म्हणाले.