मुंबई : नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेता पंकज त्रिपाठी (Actor Pankaj Tripathi) यांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलंय. व्यक्तिरेखा कोणतीही असो, तो नेहमीच आपल्या अभिनयाने त्यात जीव ओततो. ते ज्या चित्रपटात असतात, तो हिट होतो. मात्र आज ते जिथं आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला.
‘त्यांना हे आठवतही नाही’
आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना ते म्हणतात, की खरं तर काही लोकांनी माझा अपमान केला. पण त्यांना ते आठवत नाही. ते जेव्हा मला भेटतात, तेव्हा त्यांना हे आठवतही नाही की आपण याला बोललो. लोकांचं असं वागणं पाहून तुम्हाला वाईट वाटतं का, यावर ते म्हणाले, की हो वाईट तर वाटतंच.
‘शेवटी मीही माणूसच’
पुढे ते म्हणतात, की मी शेवटी माणूसच आहे. मला वाईट का वाटत नाही? मला पण राग यायचा, पण या सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतो. कारण वाईट मनात ठेवल्यानं माझंच नुकसान आहे. म्हणूनच मी पुढं गेलो. यावरून हेच स्पष्ट होतं, की त्यांचा अभिनय प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
छोट्या शहरातून मुंबईचा प्रवास
पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारचे आहेत, मनोरंजन विश्वात ठसा उमटवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. त्यानंतर त्यांना अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात आपलं अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पडद्यावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘मिर्झापूर’मधल्या ‘कालिन भैय्या’च्या भूमिकेत पंकज त्रिपाठींना खूप प्रेम मिळालं.
आगामी चित्रपट
पंकज त्रिपाठी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ते लवकरच स्पोर्ट्स ड्रामा 83मध्ये पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार(Akshay Kumar)च्या ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) आणि आमिर खान(Amir Khan)च्या ‘लाल सिंह चड्ढा'(Lal Singh Chaddha)मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.