अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ (Darlings) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. याआधी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील अभिनयासाठीही तिची वाहवा झाली होती. आलिया लवकरच हॉलिवूडमध्येही झळकणार आहे. तिच्या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पार पडलंय. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year) या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटामुळेच तिला ओळख मिळाली. पण या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी तिला किती मानधन मिळालं हे तुम्हाला माहिती आहे का? आलिया भट्ट ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे. अवघ्या 19 व्या वर्षी आलियाने करिअरमधला पहिला चित्रपट साईन केला होता. पदार्पणाच्या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसले होते. आता या पहिल्या चित्रपटासाठी आलियाला किती मानधन मिळालं, याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितलं की, “‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी तिला 15 लाख रुपये मिळाले होते. मात्र ते पैसे तिने वापरले नाहीत. तो चेक घेऊन आलियाने आई सोनी राजदान यांच्याकडे सुपूर्द केला. ती म्हणते, ‘मी तो चेक थेट आईकडे दिला होता आणि तिला खूप प्रेमाने सांगितलं, मम्मा, आता हे पैसे तुम्हीच सांभाळा आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझी आई माझे सर्व व्यवहार सांभाळते.”
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याचवेळी आलियाने या सिनेमासाठी 500 लोकांसोबत ऑडिशन दिलं होतं, त्यानंतर तिची निवड झाली. शनायाच्या भूमिकेसाठी तिला 20 किलो वजन कमी करावं लागलं होतं.