आपल्या कॉमेडीने जगाला हसवणारे कॉमेडिनय राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. गुरुवारी राजू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही तासांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमध्ये त्यांनी राजू यांचा उल्लेख “सहकारी, मित्र आणि सर्जनशील कलाकार” असा केला. राजू यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवण्यात आला होता. त्यासाठी बिग बींनी स्वत: मेसेज रेकॉर्ड करून पाठवला होता. बिग बींनी ब्लॉगमध्ये त्या रेकॉर्डिंगचाही उल्लेख केला.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राजू यांना श्रद्धांजली वाहिली. ‘आणखी एक सहकारी, मित्र आणि एक सर्जनशील कलाकार आपल्याला सोडून गेला. राजू अचानकच आजारी पडला आणि नंतर त्याचं अकाली निधन झालं. आता कुठे त्यांच्यातील सर्जनशीलता कलेमार्फत सर्वांसमोर येत होती. विनोदबुद्धी त्यांना जन्मजात मिळाली होती. त्यांनी केलेले विनोद नेहमीच आपल्यासोबत राहतील. तो आता स्वर्गातही हसत राहील आणि देवतांनाही हसवेल’, असं बिग बींनी लिहिलं.
राजू कोमामध्ये असताना रेकॉर्ड केलेल्या व्हॉइस रेकॉर्डिंगचाही बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, ‘राजू यांच्या कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी, ते शुद्धीवर येण्यासाठी रेकॉर्ड केलेला संदेश पाठवण्याची विनंती केली होती. मी माझं रेकॉर्डिंग पाठवलं होतं. माझा आवाज ऐकून राजूने एकदा डोळे उघडले. पण नंतर त्याने पुन्हा डोळे मिटले.’
राजू श्रीवास्तव हे बिग बींना खूप मानायचे. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन ते करायचे. म्हणूनच त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या रेकॉर्डिंगचा वापर कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू यांची प्राणज्योत मालवली.