अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या आगामी ‘अटॅक’ (Attack) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरून जॉनचा पारा चढला. जॉनने भर पत्रकार परिषदेत संबंधित पत्रकाराला मूर्ख म्हटलं. ‘तुम्ही डोकं घरी ठेवून आलात वाटतं’, अशा शब्दांत जॉनने सुनावलं. जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayte) या चित्रपटातील अॅक्शन सीन्सवरून पत्रकाराने प्रश्न विचारला होता. इतर कोणत्याही चित्रपटावरून नाही तर फक्त ‘अटॅक’बाबतच प्रश्न विचारले जावेत, असा जॉनचा आग्रह होता. “तुझ्या चित्रपटात अॅक्शन सीन्सचा ओव्हरडोस असतो. तू चार-पाच लोकांसोबत लढतोस, तेव्हा ठीक वाटतं. पण 200 लोकांसोबत तू एकटाच लढताना, बाईक्स उचलून फेकताना, तुझ्या हातांनी चॉपर थांबवताना पाहिल्यावर प्रेक्षक म्हणून ते पटत नाही”, असं पत्रकाराने म्हटलं.
पत्रकाराचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच जॉनने त्याला थांबवलं आणि हा प्रश्न अटॅकविषयी आहे का, असं विचारलं. जेव्हा पत्रकाराने सत्यमेव जयतेबाबतचा प्रश्न असल्याचं सांगितल्यावर जॉन म्हणाला, “मला माफ कर, पण मी इथे अटॅकबद्दल बोलायला आलोय. जर तुम्हाला त्याविषयी काही समस्या असेल, तर मी काहीच करू शकत नाही.” तुझ्या चित्रपटांमधील अॅक्शनचे सीन्स हे प्रेक्षकांना खरे वाटत नाही, असं तो पत्रकार पुढे म्हणतो. त्यावर पुन्हा जॉन त्याला म्हणतो, “मला माफ कर” आणि त्याच्या सहकलाकारांकडे वळून पत्रकाराबद्दल टिप्पणी करतो. “बिचारा, मला वाटतं तो स्वत: खूप निराश आहे”, असं जॉन त्यांच्यासमोर म्हणतो.
फिटनेसच्या बाबतीत आणखी एका प्रश्नाचं उत्तर देताना जॉन पुन्हा संबंधित पत्रकाराला टोमणा मारत म्हणतो, “शारीरिक फिटनेसपेक्षा मी मानसिक फिटनेसकडे जास्त लक्ष देतोय, कारण मला अशा मूर्ख प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. काही लोकं खरंच मूर्ख आहेत. सॉरी सर, तुम्ही डोकं घरी ठेवून आलात वाटतं. मी तुमची माफी मागतो. सर्वांच्या वतीने, मी तुमची माफी मागतो. कदाचित पुढच्या वेळी तुम्ही चांगले प्रश्न विचारू शकाल.” यावेळी जॉनने एका पत्रकाराला ‘अंकल’ (काका) असंही म्हटलं. “जर तुम्ही अंकलसारखे तेच-तेच प्रश्न विचारत बसलात, तर मी काही बोलू शकणार नाही. तुम्ही अटॅकबद्दल मला प्रश्न विचारा, त्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेन”, अशा शब्दांत तो उपस्थित पत्रकारांना सुनावतो.
लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित ‘अटॅक’ या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
Rakh: मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका
‘मी चुकलो..’; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर विल स्मिथचा जाहीर माफिनामा