जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) झालेल्या हल्ल्याबाबत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आजही काश्मीरमध्ये (Kashmir) पंडितांची हत्या होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काश्मिरी पंडितांबद्दलची विचारसरणी बदलली पाहिजे. काश्मीर फाईल्सवरून लोकांना त्यांची शोकांतिका समजली. जेव्हा आम्ही चित्रपट बनवला तेव्हा लोकांच्या मनात वेदना निर्माण झाल्या होत्या. बरेच लोक म्हणतात अनुपम खेर आता कुठे आहेत? काश्मिरी पंडितांसोबत अजूनही तेच घडत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे,” असं ते म्हणाले. शोपियांच्या छोटीपुरा परिसरातील एका सफरचंदाच्या बागेत एका नागरिकाला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती दोघेही काश्मिरी पंडित असल्याचं समजतंय.
“काश्मिरी पंडितच नव्हे तर जो कोणी भारताच्या पाठीशी उभा आहे, त्याला ते मारत आहेत. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. किती लोकांचं संरक्षण केलं जाऊ शकतं? लोकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. जे निष्पाप आहेत, ज्यांचा काहीही दोष नाही, त्यांच्यासाठी मला खूप वाईट वाटतं. तिथे राहणारे एक टक्का लोक आपलं आयुष्य कसंबसं व्यतीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, कदाचित दहशतवाद्यांचं हृदयपरिवर्तन होईल या आशेत जगत आहेत. परंतु त्यांचं हृदयपरिवर्तन होणं शक्य नाही”, अशा शब्दांत अनुपम खेर यांनी दु:ख व्यक्त केलं.
“काश्मीर फाईल्सवरून मला आणि विवेक अग्निहोत्री यांना टार्गेट करणार्यांना हे समजलं पाहिजे की आम्ही हा चित्रपट बनवला त्यामुळे तुमच्या मनात सहवेदना जागृत झाल्या. त्यामुळे त्यांना काश्मिरी हिंदू आणि पंडितांची शोकांतिका दिसली. काश्मीर फाईल्स हे काल्पनिक असल्याचं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर ही हत्या म्हणजे चपराक आहे. ज्या 5 लाख लोकांना आपलं घर सोडावं लागलं होतं, त्यांच्याबद्दल हे लोक बोलत होते की असं होऊ शकत नाही. मी त्यांना सांगेन की मी माझ्या आयुष्यात तुमच्यापेक्षा मोठा ढोंगी पाहिला नाही. ते (दहशतवादी) यशस्वी होणार नाहीत कारण स्वातंत्र्यदिनी काय झालं ते आपण पाहिलंय. काश्मीर खोऱ्यात आपल्याकडे जितके झेंडे, स्वातंत्र्य आणि विकास होत राहील, ते पाहून ते लोक हैराण होतील,” असंही खेर म्हणाले.
गेल्या 90 दिवसांपासून काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्येविरोधात लोक निदर्शनं करत आहेत. पंडितांची जम्मूमध्ये नियुक्ती करावी, अशी या लोकांची मागणी आहे. आजच्या हत्येच्या घटनेनंतर लोकांनी पुन्हा निदर्शनं केली. काश्मीरमधील परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे त्यांना जम्मूमध्ये सुरक्षित ठिकाणी तैनात करावं आणि सरकारने पंडितांवर होणारे हल्ले थांबवावेत, असं त्यांचं म्हणणं आहे.