बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. कारण अनिल अरोरा यांनी त्यांच्या वांद्रे येथील राहत्या घरातून सहा मजल्यावरुन खाली उडी मारुन स्वत:चं जीवन संपवल्याची बातमी समोर आली. पण अनिल आरोरा यांनी स्वत:ला का संपवलं? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. अनिल अरोरा यांनी सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. अरोरा यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याचा दावा अनेकांकडून केला जातोय. पोलिसांचा या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे. पण या घटनेवरुन मलायका अरोराच्या चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी चाहत्यांकडून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, अरोरा कुटुंबाकडून अधिकृतपणे या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
“आम्हाला सांगताना अतिशय दु:ख होतंय की, आमचे वडील अनिल मेहता यांचं दुख:द निधन झालं आहे. ते एक चांगले व्यक्ती होते, चांगले आजोबा, प्रेमळ पती आणि आमचे खूप चांगले मित्र होते. या नुकसानीमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही विनम्रतेने सर्व हितचिंतक आणि मीडियाला आम्हाला या कठीण काळात प्रायव्हसी देण्याची विनंती करतो. आम्हाला आपल्या समजूतदारपणाची, पाठिंब्याची आणि आदराची जाणीव आहे”, असं आवाहन अरोरा कुटुंबियांकडून करण्यात आलं आहे.
अनिल अरोरा यांचा जन्म पंजाबच्या फाजिल्का शहरात एका हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचा विवाह जॉयस पॉलीकार्प यांच्याशी झाला होता. दोघांना मलायका आणि अमृता या दोन मुली आहेत. दोन्ही मुली या चित्रपटसृष्टी आणि मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला त्यावेळी मलायका पुण्यात होती. पित्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मलायका तातडीने मुंबईत आली. दोन्ही बहिणी मुंबई विमानतळावर आल्या तेव्हा त्यांच्या तोंडावर स्कार्प होता आणि डोळ्यांमध्ये अश्रू होते.