‘डिस्को किंग’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांनी १६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. लाहिरी यांचा मुलगा बाप्पा (Bappa Lahiri) अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निद्रा श्वसनबाधा विकाराने (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया/ OAS ) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र बप्पी यांच्या मुलाने हे कारण नाकारलं. त्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं, याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीत बाप्पा म्हणाला, “गेले महिनाभर वडिलांवर जुहू इथल्या क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना घरी जायची फार इच्छा होती. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांनी जेवण सोडलं आणि संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.”
मंगळवारी मध्यरात्रीपूर्वी त्यांचं निद्रा श्वसनबाधा विकाराने (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया) निधन झालं, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. मात्र बाप्पा लाहिरीने हे कारण नाकारलं. “नाही, त्यांना श्वसनबाधा झाली नव्हती. मला वाटतं, त्याचं हृदय धडधडणं बंद झालं होतं. माझी बहीण, आई आणि भावोजींनी डॉक्टरांना घरी बोलावलं असता त्यांनी ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मी त्यावेळी सतत फोनद्वारे संपर्कात होतो”, असं त्याने सांगितलं.
रुग्णालयात असताना बप्पी दा हे अधूनमधून गाणी गुणगुणत असत, असंही बाप्पाने सांगितलं. “त्यांच्या बेडजवळ असणाऱ्या टेबलावर हाताने आवाज करत ते गाणी गुणगुणत असत. एकेदिवशी ते अचानक मोठ्याने रुग्णालयात गाणी गाऊ लागले होते. त्यावेळी आईसुद्धा आश्चर्यचकित झाली होती”, असं तो पुढे म्हणाला. चित्रपटसृष्टीत आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेले बप्पी लाहिरी हे ‘बप्पी दा’ याच टोपण नावाने लोकप्रिय होते. ४२ वर्षांपूर्वी कोलकात्याहून मुंबईत आलेल्या बप्पी दा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गायक-संगीतकार म्हणून आपली ओळख निर्माण केली.