वाराणासी : भोजपुरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे हिने आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आकांक्षाने अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकांक्षाची आई मधु दुबे हिच्या तक्रारीवरून समर सिंह आणि तिचा भाऊ जय सिंह यांच्यावर आकांक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शनिवारी नॉर्मल होती. शुटिंगसाठी वाराणासीला आली होती. रविवारी सकाळी तिच्या नव्या सिनेमाचं चित्रीकरण होणार होतं. पण सकाळी तिच्या रुमचा दरवाजा उघडला तर तिचं शरीर पंख्याला लटकलेलं आढळून आलं. आकांक्षाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आकांक्षाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आलेला नाही. मात्र, आकांक्षाने ज्या दिवशी आत्महत्या केली त्या रात्री तिला सोडण्यासाठी एक व्यक्ती आली होती. ही व्यक्ती आकांक्षाच्या रुममध्ये 17 मिनिटांपर्यंत थांबली होती. त्यामुळे आकांक्षाला सोडायला आलेली व्यक्ती कोण? ही व्यक्ती आकांक्षाच्या रुममध्ये एवढा वेळ का थांबली होती? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आकांक्षाच्या रुममधून ती व्यक्ती गेल्यानंतर आकांक्षा इन्स्टाग्राम लाईव्हवर आली होती. त्यावेळी ती रडताना दिसत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. वाराणासीच्या सारनाथ परिसरातील हॉटेल सोमेंद्र रेसिडेन्सीमध्ये आकांक्षा थांबली होती. त्याच हॉटेलमध्ये पोलीस पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाची आणि त्या व्यक्तीबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे.
आकांक्षा हॉटेलमध्ये आली तेव्हा तिला चालताही येत नव्हतं, असं हॉटेलच्या मॅनेजरचं म्हणणं आहे. तिला सोडण्यासाठी एक व्यक्ती आला होता. तिला चालता येत नव्हतं. तो तिला तिच्या रुमपर्यंत घेऊन गेला. त्या ठिकाणी तो 17 मिनिटे होता, असं हॉटेलच्या मॅनेजरने सांगितलं. दरम्यान, ती व्यक्ती कोण होती? तो तिला सोडण्यासाठी का आला होता? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा शनिवारी एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. रात्री 8 वाजता तिने तिच्या आईशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये बनवलेली एक रील साडे आठ वाजता इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यानंतर ती पार्टीला गेली. पार्टीहून रात्री 1.55 वाजता ती परत हॉटेलला आली होती.