मुंबई : द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अनेक मोठ्या वादांनंतर आज रिलीज झालाय. या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला. सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. अनेकांनी तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच कोर्टामध्ये धाव घेतल्या. मात्र, शेवटी अनेक वादांनंतर आज हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. इतकेच नाही तर विकेंडला द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) धमाल करेल असा दावा सातत्याने केला जातोय. या चित्रपटामध्ये अनेक मोठे आणि धक्कादायक (Shocking) खुलासे हे करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झालीये. चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे न्यायालयाने द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिलाय. मात्र, 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्यावर चित्रपट निर्मात्यांनी सहमती दाखवलीये.
न्यायमूर्ती नागारेश यांनी म्हटले की, त्या मुली 32 हजार होत्या हे तुम्ही कसे म्हणून शकता? द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांची बाजू मांडणाऱ्या रवी कदम यांनी सांगितले की, आम्हाला अशी माहिती सांगण्यात आली होती की, गायब होणाऱ्या मुलींचा आकडा हा 32 हजार होता आणि तिच माहिती ही आम्ही चित्रपटाच्या टिझरमध्ये दाखवली.
पुढे रवी कदम म्हणाले की, पण यानंतर आम्ही पुढे तसे म्हणणार नाहीत. इतकेच नाही तर वकिलांनी ते सर्व सोशल मीडियावर काढून टाकणार असल्याची देखील माहिती दिली. द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद कोर्टात पोहचलाय. चित्रपट निर्मात्यांना दिलासा देत चित्रपटावर बंदी येणार नसल्याचे तर स्पष्ट झाले आहे. चित्रपटही बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसतोय.
आज सकाळपासूनच प्रेक्षकांचा द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिसतोय. चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे. ओपनिंग डेला चित्रपट 10 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाजा वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक देखील केले आहे. अनेकांना हा चित्रपट जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.