मुंबई : पडद्यावरील आपल्या अभिनयाच्या जादूने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अर्थात शाहरुख खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे चाहते फक्त भारतामध्ये नसून संपूर्ण जगात आहेत. शाहरुख खानला ‘किंग खान’ म्हणून देखील ओळखले जाते. दरवर्षी चाहते शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर मोठी गर्दी करतात. आज सकाळपासूनच चाहत्यांनी मन्नत बाहेर गर्दी केलीये.
शाहरुख खानने अत्यंत मेहनतीने पैसा आणि नाव कमावले आहे. शाहरुखची संपत्ती एखाद्या हाॅलिवूड स्टारपेक्षा कमी नाहीये. शाहरुख आज 5000 कोटींचा मालक आहे. लवकरच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. शाहरुख जरी आज बाॅलिवूडमध्ये राज्य करत असला तरीही शाहरुखला अभिनयामध्ये काहीच रूची नव्हती. शाहरुख खानला धावपटू बनायचे होते.
आतापर्यंतच्या आपल्या बाॅलिवूड करिअरमध्ये शाहरुख खानने तब्बल 72 हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका केलीये. दिल तो पागल है, कुछ कुछ होता है… हे चित्रपट तर शाहरुखचे बाॅक्स आॅफिसवर हीट ठरले. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीचे क्रेझ बघायला मिळते. शाहरुखने आपल्या करिअरच्या सुरूवातीलाच गौरी खानशी लग्न केले.
गेल्या काही वर्षांपासून चाहते शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. पठाण हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. 57 वर्षीय शाहरुख पठाण चित्रपटात काय धमाका करणार याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. पठाण चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख खानचा जबरदस्त असा लूक बघायला मिळाला आहे.