मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली. त्याच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि टीव्ही जग शोकात आहे. इतक्या लहान वयात त्याने या जगाचा निरोप घेतला यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीय. सिद्धार्थ शुक्ला पूर्णपणे निरोगी होता. मात्र, सिद्धार्थ शुक्ला हा बॉलिवूड जगतातील एकमेव कलाकार नाही, ज्याचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यापूर्वी मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
बॉलिवूडमध्ये इतर अनेक कलाकार आहेत जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते आणि त्यांच्या कुटुंबासह आनंदी जीवन जगत होते. पण अचानक या कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. असेही अनेक कलाकार आहेत, ज्यांना अगदी लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला.
राम तेरी गंगा मैली, आसमान, मेरे साथी अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजीव कपूर रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू होते. रणधीर कपूर यांच्या घरी असताना राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा रणधीर कपूर त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजीव कपूरचे वय फक्त 58 वर्षे होते. त्यांचे वडील राज कपूर यांचेही 1988 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडाले होते. सरोज खान बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या, परंतु उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या आणि घरी देखील परतल्या होत्या. 3 जुलै रोजी सरोज खान यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 72 व्या वर्षी डान्स मास्टर सरोज खान यांनी या जगाचा निरोप घेतला.
संजीव कुमार हे एक प्रसिद्ध अभिनेते होते, त्यांनी परिचय, मौसम, आंधी सारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. पण अगदी वयाच्या 48व्या वर्षी या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. 6 नोव्हेंबर 1985 रोजी संजीव कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला. असे म्हटले जाते की संजीवकुमारच्या कुटुंबातील बहुतेक पुरुषांचे तारुण्यातच निधन झाले. यामुळे संजीवकुमार यांनाही अनेकदा हृदयविकाराची चिंता असायची.
विनोद मेहरा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. विनोद मेहरा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तेव्हा ते केवळ 45 वर्षांचे होते. विनोद मेहरा यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 100 चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्याच्या यशस्वी चित्रपटांमध्ये लाल पत्थर, अमर प्रेम, हिफाजत सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
आजही जेव्हा किशोर कुमारचे नाव येते, तेव्हा त्यांची गाणी लोकांच्या मनात ताजी होतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि गायक किशोर कुमार यांनी चाहत्यांच्या मनावर तसेच बॉलिवूडवर अनेक वर्षे राज्य केले. पण 13 ऑक्टोबर 1987 रोजी या महान कलाकाराने या जगाचा निरोप घेतला. 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:45 वाजता किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. या महान कलाकाराने वयाच्या अवघ्या 58व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
हम साथ – साथ हैं , हम आपके हैं कौन या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी 18 मे 2017 रोजी अचानक या जगाचा निरोप घेतला. रीमा लागू यांना 18 मे रोजी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. त्या पूर्णपणे ठीक होत्या आणि नुकत्याच सिरीयलच्या शूटिंगमधून परतल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.
झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?
‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही