मुंबई : ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाच्या रिलीजसाठी अवघे काही तास उरले आहेत. चित्रपटाची संपूर्ण टिम सध्या जोरदार प्रमोशन (Promotion) करताना दिसतेय. आमिर खान, अक्षय कुमार यांचे बहुचर्चित चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आता रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र बाॅक्स आॅफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट काही खास कमाल दाखू शकले नाहीयंत. आता ब्रह्मास्त्र चित्रपटासंदर्भात मध्य प्रदेशातून एक अत्यंत मोठी बातमी पुढे येऊ लागलीयं.
मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालच्या दर्शनासाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर जाणार होते. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीमला मंदिरात जाण्यापासून रोखल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. बजरंग दलाच्या विरोधामुळे रणबीर आणि आलिया मंदिरात पोहोचू शकले नाहीत. मात्र, प्रचंड विरोध होत असताना चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि टीमने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुरक्षेमुळे रणबीर आणि आलियाला अर्ध्या रस्त्यामधूनच परतावे लागले.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी सायंकाळी 7 वाजता महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. दुपारी 4 वाजल्यापासून बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी गेटभोवती जमू लागले. मात्र, याची कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. प्रोडक्शन टीमची वाहने जशीही गेटजवळ पोहचली तशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवले.
या प्रकरणाची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान पोलिस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चित्रपटाची टीम आणि अयान मुखर्जी मंदिरात गेले आणि दर्शन घेऊन परतले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा रणबीर कपूर आणि आलियाला विरोध होता. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने एका व्हिडीओमध्ये बीफ खाण्याचे वक्तव्य केले होते, यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात येण्यास रणबीर आणि आलियाला विरोध केल्याचे कळते.