गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीविरुद्ध बॉलिवूड (Bollywood) अशी बरीच चर्चा होत आहे. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक हिट होत असतानाच, बॉलिवूडचे चित्रपट मात्र दणक्यात आपटतायत. याचं ताजं उदाहरण म्हणजे रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपट. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेले अनेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवरील हिंदी चित्रपटांचं वर्चस्व संपत चाललं आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॉलिवूड संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) विचारण्यात आला. त्यावर त्याने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’सारखे हिट चित्रपट देणाऱ्या करण जोहरने हे मान्य केलं की प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणं हे एक आव्हान बनलं आहे. पण बॉलिवूड संपुष्टात आलंय यावर त्याचा विश्वास नाही. करण म्हणाला की, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ‘पीटीआय’शी संवाद साधताना करण म्हणाला, “हे सर्व बकवास आहे. चांगले चित्रपट नेहमीच चालतात. ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘भुल भुलैया 2’ने चांगली कमाई केली आहे. ‘जुग जुग जियो’ची कमाईही आपण पाहिली आहे. जर चित्रपटच चांगले नसतील तर ते कधीच चालणार नाहीत.”
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट 84 कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडिओवर दाखवला जात आहे. त्याच वेळी ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘भुल भुलैया 2’ या दोन्ही चित्रपटांनी थिएटरमध्ये शंभर कोटींहून अधिक कमाई केली. तर रणबीरचा ‘शमशेरा’, अजय देवगणचा ‘रनवे 34’, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि सलमान खानचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या सिनेमांनी कमाईच्या बाबतीत निराशा केली. पण ‘पुष्पा’, ‘RRR’ आणि ‘KGF 2’ यांसारख्या साऊथच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालता आहे. ‘KGF 2’ने बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती.
करण जोहर म्हणाला की, “आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतील अशी मला आशा आहे. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणं आता इतकं सोपं नाही. तुमचा चित्रपट, ट्रेलर, प्रमोशन हे सर्व काही खूप चांगलं आहे हे तुम्हाला प्रेक्षकांना आधी पटवून द्यावं लागतं. तुम्हाला तुमची सर्व शक्ती पणाला लावावी लागते. हे एक आव्हान नक्कीच आहे, पण मला आव्हानं स्वीकारायला आवडतात.”
करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण तब्बल 6 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन आणि प्रीती झिंटासारखे स्टार्स दिसणार आहेत.