मुंबई : नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य (Choreographer Ganesh Acharya) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गणेश आचार्य यांनी अश्लील व्हीडिओ बघण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय छेडछाड, पाठलाग केल्याचंही या तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. 2020 मध्ये एका महिलेने ही तक्रार केली होती. काल एका पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आणि ही बाब उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबईतील अंधेरी (Andheri) भागातील ओशिवरा पोलीस स्टेशनचे (Oshiwara Police Station) अधिकारी संदीप शिंदे (Sandip Shinde) यांनी अंधेरीतील संबंधित महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असल्याचं सांगितलं आहे. गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकावर कलम 354- अ (लैंगिक छळ), 354-क (व्हॉयरिझम), 345-ड (पाठलाग करणं), 509 (महिलेचा अपमान), 323 (दुखापत), 504 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिला कोरिओग्राफरने 2020 मध्ये गणेश आचार्य यांच्या विरोधात तक्रार केली होती. तक्रारदार महिला म्हणते की, “मी गणेश आचार्य यांच्या ऑफिसमध्ये काम करायचे. तेव्हा मी ऑफिसमध्ये गेले की त्यांच्याकडून मला चुकीची वागणूक मिळायची. माझ्याबद्दल वाईट बोललं जायचं शिवाय मला अश्लील व्हिडिओ पाहण्यास सांगितलं जायचं. मी याला नकार दिल्यानंतर त्यानी मला त्रास देण्यास सुरुवात केली.” या महिलेने या सगळ्याला नकार दिल्यावर भारतीय चित्रपट आणि टीव्ही कोरियोग्राफर असोसिएशनने सहा महिन्यांनंतर तिचं सदस्यत्व रद्द केलं.
गणेश आचार्य यांना विरोध केल्यानंतर एका सभेत आपल्याला मारहाण झाल्याचीही तक्रार या महिलेने केली आहे. गणेश यांनी शिवीगाळ केली शिवाय मारहाण केली त्यानंतर मी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर मी वकिलांच्या मदतीने आरोपपत्र दाखल केलं असल्याचं या महिलेने म्हटलंय.
गणेश आचार्य हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहेत. गणेश आचार्य यांच्या तालावर अनेक कलाकार थिरकलेत. त्यांना टॉयलेट – एक प्रेम कथा सिनेमातील गोरी तू लाथ मार गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पोपट पिसाटला या त्यांच्या गाण्याला विशेष पसंती मिळाली आहे.