मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी पुढे येतंय. ऑस्कर पुरस्कारासाठी (Oscar Award) गेलेल्या चित्रपटातील बालकलाकाराचा मृत्यू झालाय. दुःखद म्हणजे या चिमुकल्याच्या तेरावीच्या दिवशीच त्याचा छेल्लो शो हा चित्रपट (Movie) रिलीज होतोय. भारतातून यावर्षी ऑस्करसाठी गेलेल्या छेल्लो शो या गुजराती चित्रपटाचा बालकलाकार राहुल कोळी याचे निधन झाले. कॅन्सरमुळे (Cancer) राहुलचा मृत्यू झालाय. राहुलला ल्युकेमिया नावाचा कॅन्सर झाला होता. तीन बहीण भावामध्ये राहुल हा सर्वात मोठा होता. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच राहुलने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जातंय.
अत्यंत कमी वयामध्ये राहुलने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली. राहुलच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील रिक्षाचालक आहेत आणि राहुलला तीन बहीण भाऊ आहेत. छेल्लो शो हा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, त्याअगोदरच राहुलने जगाचा निरोप घेतलाय. राहुलचा अभिनय जगासमोर येण्याआधीच तो जग सोडून गेला. राहुल गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसोबत झुंज देत होता.
बालकलाकार राहुल कोळीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही सर्वांनी सकाळी नाश्ता केला. मात्र, त्यावेळी राहुलला ताप होता. त्यानंतर राहुलने तीन रक्ताच्या उलट्या केल्या आणि राहुलचा तापही कमी होत नव्हता. त्याची तब्येत इतकी जास्त खालावली की, काही वेळातच राहुल आम्हाला सोडून गेला. आम्ही आमच्या पोटच्या गोळ्याला वाचवू शकलो नाही… राहुलला कॅन्सर झाला होता.
छेल्लो शो या चित्रपटात भाविन रबारी मुख्य भूमिकेत आहे तर राहुल कोळी त्याच्या मित्राच्या भूमिकेत आहे. राहुलच्या अशाप्रकारे जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. राहुलचे वडील म्हणाले की, आम्ही आमच्या मुलाचा शेवटचा चित्रपट बघायला जाणार आहोत. त्याच्या तेरावीच्याच दिवशी त्याचा छेल्लो शो हा चित्रपट रिलीज होतोय…हे म्हणताना राहुलच्या वडिलांचा कंठ दाटून आला होता.